घरगुती गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनासाठी महापालिकेची नियमावली जाहीर

मुंबईतील नागरिकांनी गणेशोत्‍सव-२०२१ साजरा करताना पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

श्री. गणरायांचे आगमन येत्या शुक्रवारी घरांघरांमध्ये होणार असून, गणरायांना निरोप देण्यासाठी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमध्ये केवळ दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. घरगुती गणेशमूर्तींचे आगमन तसेच विसर्जन करताना केवळ पाच व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. परंतु त्यांना विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन मुंबई महापालिका व शासन स्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात येत आहे. या अनुषंगाने मुंबईतील नागरिकांनी गणेशोत्‍सव-२०२१ साजरा करताना पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

 • घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी.
 • शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्ती ऐवजी घरात असलेल्या धातू अथवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन तथा विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे आणि कुटुंबियांचे कोविड-१९ पासून रक्षण करणे शक्य होईल.
 • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
 • घरगुती गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपाचे नसावे.
 • आगमन व विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा.

(हेही वाचाः गौरी-गणपतीनंतर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?)

 • शक्‍यतो या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावेत.
 • गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे.
 • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना संपूर्ण चाळीतील तथा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.
 • श्री. गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी २ फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी.
 • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे.

(हेही वाचाः हिंदूंच्या सणांवर बंदी आणण्याआधी सरकारमधील कोरोना स्प्रेडरकडे लक्ष द्या!)

 • विसर्जनाप्रसंगी मास्‍क/शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावीत.
 • शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here