सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन व विसर्जनासाठी ‘हे’ आहेत नियम

गणेशोत्सवादरम्यान निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात येत आहे.

गणेशोत्सवामध्ये श्री. गणेश मूर्तींची उंची चार फुटांपर्यंत करण्याचे निर्बंध असतानाच कोविडच्या पार्श्वभूमीवर उत्सव मंडळांना आगमन आणि विसर्जन सोहळ्यात दहा पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. मात्र, या दहाही व्यक्तींचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस उलटलेले असायला हवे, असे नियम महापालिकेने जारी केले आहेत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्स वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच, कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येऊ नये, असे नियम जारी करण्यात आले आहेत.

महापालिकेतर्फे निर्बंध जाहीर

सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या प्रकोपापासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करुनच गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी सन २०२१च्या गणेशोत्सवादरम्यान निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात येत आहे.

(हेही वाचाः घरगुती गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनासाठी महापालिकेची नियमावली जाहीर)

असे आहेत नियम

  • मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्‍यक्षतेखाली गणेशोत्‍सव मंडळ प्रतिनिधींच्‍या उपस्थितीत २ सप्टेंबर २०२१ रोजी दूरदृश्‍य प्रणालीसह झालेल्‍या बैठकीत मागील काही दिवसांतील कोविड-१९ रुग्‍णांची वाढती संख्‍या तसेच या रोगाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता, भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन तथा मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  • गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादींद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी, असा निर्णय घेण्‍यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार/फुले इत्यादींचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी.
  • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत.
  • कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

(हेही वाचाः गौरी-गणपतीनंतर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन?)

  • सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेऊ नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेऊन जावे.
  • विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्‍यास तथा पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  • महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.
  • मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here