वलसाड उंबरगाव येथील बिल्डर जितू पटेल यांचे नाट्यमयरित्या अपहरण करण्यात आले होते. मात्र सुरत पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पटेल यांची सुखरूप सुटका केली. याविषयी गुजरातच्या विधानसभेत गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचे कौतुक केले.
…आणि पटेल त्यांच्याच फोनवरून मागितली खंडणी!
२२ मार्च २०२१ रोजी उंबरगाव (उमरगाव) येथील बांधकाम व्यावसायिक जितू पटेल यांचे चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवू अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी पटेल यांच्याच फोनवरून ३० कोटी रुपयांची खंडणीही मागितली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याविरोधात प्रत्यक्षदर्शी राजेश सिंह यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी २३ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करून घेतला.
१ हजाराहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले!
या सर्व घटनेवर गुजरात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा गुजरातचे गृहमंत्री यांनी घडलेला सर्व घटनाक्रम सभागृहात सांगितला. अपहरणाच्या घटनेनंतर वलसाड पोलिस, सुरत क्राईम ब्रांच आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्तपणे तपासाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचे साहाय्य घेतले. तपासांतर्गत गुजरात ते मुंबई या दरम्यानच्या १ हजाराहून अधिक खासगी आणि सरकारी कार्यालयांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचवेळी जितू पटेल यांचे मित्र प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी याबाबत वसई-विरार विभागाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन गुजरात पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार डिटेक्शन पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना कारुळकर आणि त्यांचे वलसाडमधील मित्र राजू सुब्रह्मण्यम यांनी सविस्तर माहिती दिली.
(हेही वाचा : राज्यात लसीकरणाचा चौथा टप्पा! लसीकरण केंद्रातील गोंधळाचे काय? )
पटेल यांना रत्नागिरीत डांबून ठेवले होते!
त्यानंतर मात्र मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने एक टीम बनवली. त्यांना सीसीटीव्हीमधून दोन अपहरणकर्ते राजधानी एक्स्प्रेसमधून मुंबईला आल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी बोरिवली येथे सापळा रचला. त्या ठिकाणीच अपहरणकर्त्यांचे धागेदोरे सापडले. त्याठिकाणी पोलिसांनी एका संशयीताला पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्यांच्या दोन साथीदाऱ्यांनी जितू पटेल यांना रत्नागिरी येथील दुर्गम भागात ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे वलसाड, सुरत पोलीस, सुरत क्राईम ब्रांच, गुजरात एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या टीमने त्या ठिकाणी धाड टाकून पटेल यांची सुखरूप सुटका केली.
७ जणांना ठोकल्या बेड्या!
या सर्व गुन्ह्यात पोलिसांनी ७ जणांना बेड्या ठोकल्या. पप्पू चौधरी, दीपक उर्फ अरविंद यादव, अजमल हुसेन अन्सारी, अयाझ, मोबीन उर्फ टकल्या, इशाक मुंजावर आणि जितनेश कुमार उर्फ बबलू कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ पिस्तुल, २ मॅग्जिन, ८ फोन आणि काही सीमकार्ड रोकड रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या आणि दिल्लीहून चोरलेल्या होंडा आणि फॉर्च्युन गाड्या, नकली नंबर प्लेट, काही खोटी ओळखपत्रे जसे की काही आधारकार्ड वगैरे असा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पप्पू चौधरी हा पश्चिम बंगालच्या कारागृहात तुरुंगवास भोगत असलेला चंदन सोनार याचा उजवा हात मानला जातो. या घटनेमध्ये गुजरातचे डीजीपी, सुरत रेन्ज, वलसाड पोलिस, गुजरात एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांनी अभूतपूर्व कामगिरी केली, असे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.