दिल्लीतील एम्सचे सर्व्हर हॅक केल्यानंतर हॅकर्सनी तामिळनाडूतील श्री सरन मेडिकल सेंटरच्या दीड लाख रुग्णांची वैयक्तिक माहिती चोरुन ऑनलाईन विकली आहे. सायबर धोक्यांवर लक्ष ठेवणारी कंपनी क्लाऊडसेकने या डेटा चोरीची माहिती दिली.
रुग्णांचा वैयक्तिक डेटा सायबर क्राईम फोरम व टेलिग्राम चॅनलवर विकला गेला आहे. हा डेटा साॅफ्टवेअर पुरवणा-या थ्री क्यूब आयटी लॅब या ति-हाईत कंपनीकडून मिळवण्यात आला होता.
( हेही वाचा: PMPML च्या प्रवाशांसाठी पुन्हा सुरू होणार ‘ITMS’ यंत्रणा, कसा होणार फायदा? )
हॅकर्सनी शेअर केला डेटाचा नमुना
संभाव्य खरेदीदारांना डेटाची सत्यता तपासता यावी म्हणून हॅकर्सनी डेटाचा नमुना शेअर केला होता. लीक झालेल्या डेटामध्ये रुग्णांची नावे, जन्मतारीख, पत्ते, काळजीवाहकांची नावे आणि डाॅक्टरांचा तपशील आदी बाबींचा समावेश आहे.
एम्सचे सर्व्हर 12 दिवसांपासून हॅक
- देशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेले नवी दिल्ली येथील एम्सचे सर्व्हर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून बंद आहे. सर्व्हर हॅक करणा-यांनी तब्बल 200 कोटींची मागणी केली.
- या प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-यांनी एम्स हॅकिंगमागे चीनचा हात असल्याचे म्हटले आहे. सायबर सेलच्या मते हॅकिंग दरम्यान वैयक्तिक डेटादेखील लीक झाला. हा डेटा डार्क वेबच्या मुख्य डोमेनवरही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील व्हीव्हीआयपींसह लाखो रुग्णांचा गु्प्त डेटा लीक होण्याची शक्यता बळावली आहे.