मालाडमध्ये फेरीवाल्यांसह दुकानदारांनीही अडवला पदपथ: स्टेशन परिसर कधी होणार फेरीवालामुक्त

254

मुंबईतील रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी असतानाच मालाड रेल्वे स्टेशनच्या बाहेरच फेरीवाल्यांनी अशाप्रकारे जागा अडवून ठेवल्या आहेत की, एक मार्गिका असलेल्या या रस्त्यांवरुन रिक्षांसह इतर वाहनांनाही या फेरीवाल्यांमुळे अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे फेरीवाल्यांनी अशाप्रकारे पदपथ काबिज केल्या आहेत की, लोकांना पदपथ तर चालण्यासही शिल्लक नाही, त्याचाच फायदा घेऊन दुकानदारांनीही पदपथ अडवल्याने मालाड पश्चिम भागातील स्टेशन रोड परिसरात पदपथ दाखवा आणि बक्षिस मिळवा अशी योजना जाहीर करण्याची वेळ आली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसराच्या आतील विक्रीसाठी बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार काही विभागांमध्ये याची अंमलबजावणी होत असली तरी मालाड भागात रेल्वे स्थानकाच्या परिसरातच फेरीवाल्यांनी आपले व्यावसाय थाटल्याचे दिसून येत आहे. मालाड पश्चिम दिशेला स्टेशन रोडवरील स्थानकातून बाहेर पडल्यानंतर एम एम मिठाईवाला समोरील बाजूने पुढे हनुमान मंदिरापर्यंत फेरीवाल्यांनी रस्त्यांची जागा अडवली आहे. त्यातच रिक्षा चालक रांगेतून व्यवसाय करत असल्याने या फेरीवाला आणि रिक्षा चालक यांच्यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर वाहनांसह बेस्टच्या बसलाही गर्दीतून अडकत मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण स्टेशन नजिकच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी विळखा घातला असून एक्मे शॉपिंग सेंटर आणि केडिया शॉपिंग सेंटर येथील पदपथांचे दर्शनही नागरिकांना होत नाही. या पदपथांच्या सुधारणेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे, परंतु त्याचा वापर जनतेऐवजी फेरीवाल्यांकडूनच अधिक होत आहे.

याशिवाय हनुमान मंदिर येथील स्टेशन रोडच्या दोन्ही बाजुला दुकानदारांनी पदपथ काबीज केल्या. त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर करण्याऐवजी रस्त्यांवरुन चालावे लागते. येथील रस्ता एक मार्गी असल्याने दि मॉलच्यासमोरील भागातही फेरीवाल्यांनी निम्या रस्त्यांच्या भागापर्यंत अतिक्रमण केले आहे. तर साईनाथ मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ फेरीवाल्यांनी पदपथासह रस्ताही अतिक्रमित केल्याने नक्की येथील पदपथ व रस्ता कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या भागांमधील पदपथही फेरीवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमित केल्याने नेमके महापालिका प्रशासन काय करते असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, फेरीवाल्यांना आता महापालिकेची भीती राहिलेली नाही. फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत होत असल्याने दुकानदारही आता पदपथावर आपले विक्रीच्या सामानांचे प्रदर्शन करत आहेत.

(हेही वाचा – शिवाजी पार्कमधील ‘तो’ खड्डा बुजवला, आता चालता येणार बिनधास्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.