- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात (Hawker) कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत मागील सात दिवसात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात ५४४ चारचाकी हातगाड्या, ९६८ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २५१ इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवाला मुक्त ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने, मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात (Hawker) मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जात आहे.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : मराठी भाषिकांची मते मिळविण्यासाठी BJP चे राज्यातील नेते सज्ज)
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील (Hawker) कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांनी संयुक्त कार्यवाही सुरू आहे.
उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव म्हणाल्या की, मुंबईतील विविध विभागांमध्ये दिनांक १७ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ या सात दिवसात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत. नियमित कार्यालयीन वेळेखेरीज, दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत दररोज ही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे. ही धडक कारवाई सातत्याने राबविण्यात येणार आहे.
या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य…
जप्त साधनांची एकूण संख्या – २,७६३
चारचाकी हातगाड्या – ५४४
सिलिंडर – ९६८
स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – १,२५१
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=PSmGP58iZxs
Join Our WhatsApp Community