-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करता येत नसेल तर किमान जे त्यानंतर रस्त्यावर बसून व्यवसाय करत आहेत, त्यांना तरी हटवा अशी आर्जवी आता दादरमधील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. दादर पश्चिम भागांत सध्या पदपथासोबतच रस्त्यावरही फेरीवाल्यांनी ठाम मांडला असून अनेक हातगाड्याही रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येथील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची इच्छा नसेल तर किमान रस्ते अडवून ज्या हातगाड्या आणि फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर तरी कारवाई करावी अशी आर्जवी दादर व्यापारी संघाने केली आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांविरोधात महापालिकेच्यावतीने धडक कारवाई हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखाऊपणा पुरतीच असल्याचे दिसून येत आहे. त्यातच दादर व्यापारी संघाने वीर कोतवार उद्यानासमोरील केळकर मार्गावरील खांडके बिल्डींग मार्ग परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांविरोधात (Hawkers) कारवाई करण्याची मागणी करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
(हेही वाचा – काँग्रेस नेते Rashid Alvi यांच्याकडून मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचे समर्थन; म्हणाले…)
त्यातच दादर व्यापारी संघाच्या मागणीनुसार स्थानिक पोलिका आणि महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत मागील आठवड्यात वनिता समाज येथील हॉलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केळकर मार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यांच्या चौकांतील रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर आणि शाळा, कॉलेज तसेच मंडई आदींपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन ना महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून केले जात ना पोलिस प्रशासनाकडून. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार किमान रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, मग इतर ठिकाणी कशी होणार असा सवाल उपस्थित करून न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करायची नसेल तर नका करू! पदपथावर जर आपल्याला फेरीवाले (Hawkers) पाहिजे असतील आणि कारवाई करायची नसेल नका करू, पण जे फेरीवाले गेल्या काही महिन्यांमध्ये रस्त्यावर येऊन व्यवसाय करत आहे, रस्ते अडवून हातगाड्या आणि बाकडे लावून व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर तरी कारवाई करावी अशी विनंती वजा आर्जवीच व्यापारी संघाने यावेळी केल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : डॉ. आंबेडकरांचे कार्य सामाजिक समरसतेचे; भाजपाच्या अर्चना वानखेडे यांचे प्रतिपादन)
दादर व्यापारी संघाचे पदाधिकारी सुनील शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारची बैठक झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची इच्छा महापालिका आणि पोलिसांची दिसून येत नाही. त्यामुळे किमान पदपथासह रस्त्यावर ठाम मांडून व्यवसाय करतात त्यांच्यावर तरी कारवाई करावी अशी मागणी व्यापारी संघाने केल्याचे सांगितले. केळकर मार्गाला जोडणाऱ्या कोतवाल उद्यानसमोरील चौक परिसर, रानडे मार्ग चौक, गोल हनुमान मंदिर चौक, कबुतर खाना चौक आदी परिसरांमधील रस्त्यावरील सर्व फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करण्याची मागणी आमची आहे. येत्या प्रभादेवीतील येथील रेल्वे मार्गावरुन जाणारे पूल तोडण्यात येत असून यामुळे टिळक पुलावरील वाहतूक वाढली जाणार आहे. जर हे फेरीवाले अशाप्रकारे रस्ते अडवून बसले तरी आधीच वाहतूक कोंडीच मोठी समस्या आहे, त्यात ही समस्या अधिक वाढली जाण्याची शक्यता आहे. दादरमधील व्यापारी हे स्थानिक रहिवाशीही असून व्यापारी म्हणून नव्हे तर रहिवाशी म्हणूनही आम्हाला या रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे. पण या बैठकीनंतरही कोणतीही ठोस कारवाई होत असल्याचे दिसून येत नसल्याची नाराजीही शाह यांनी व्यक्त केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community