दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा वाढू लागला असून हा विळखा आता कायमस्वरुपी सोडवला जात आहे. हा परिसर यापुढे कायमस्वरुपी फेरिवालामुक्त ठेवण्याचा निर्धार करत जी उत्तर विभागाने या परिसरातील सर्वच फेरीवाल्यांना हटवले आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून शिवाजी पार्क परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे. यापुढेही या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) परिसरात वडापाव, शेवपुरी तसेच मोमोजच्या स्टॉल्ससह रस्त्यांच्या परिसरात खाद्य विक्रीची वाहने उभी आहेत. याशिवाय सरबत, भेल आदींसह भाजीसह इतर वस्तूंच्या विक्रीच्या हातगाड्याही लावल्या जातात. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठ्याप्रमाणात खाद्य विक्रीसह इतर वस्तूची विक्री केली जात असल्याने मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. याविरोधात स्थानिक नागरिकांकडून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी या परिसराला फेरीवालामुक्त बनवण्याण्यासाठी कायमस्वरुपी कारवाई हाती घेतली आहे. यासाठी दादरमधील अतिक्रमण विभागाचे एक वाहन शिवाजीपार्क परिसरात तैनात ठेवण्यात आली आहे.
(हेही वाचा – पवईतील अर्धवट सायकल ट्रॅक तोडण्यासाठी ६६ लाखांचा खर्च; भाजप, काँग्रेसने केली ‘ही’ मागणी)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीपार्क परिसरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून रस्त्यांवर फुड व्हेहीकल उभ्या राहिल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, शिवाय येथील फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रारी आल्याने ही कारवाई मागील काही दिवसांपासून हाती घेण्यात आली आहे, तसेच पुढेही ती कायम ठेवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community