Hawkers Policy : नगरपथ विक्रेता समिती निवडणूक, महिला आरक्षण सोडत येत्या सोमवारी

1625
Hawkers Policy : नगरपथ विक्रेता समिती निवडणूक, महिला आरक्षण सोडत येत्या सोमवारी

नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण निश्चित करण्याबाबत सोमवार, २९ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक-२ मध्ये सोडतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या सोडतीचे महानगरपालिकेच्या ‘यूट्यूब’ समाजमाध्यम खात्यावरुन थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. (Hawkers Policy)

एकूण आठ प्रतिनिधींपैकी एकूण ३ पदे महिलांसाठी राखीव

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगरपथ विक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीच्या रचनेमधील एकूण आठ प्रतिनिधींपैकी एक तृतियांश म्हणजेच एकूण ३ पदे ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. (Hawkers Policy)

(हेही वाचा – आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; Bharat Gogawale यांची उच्च न्यायालयात याचिका)

सोडत प्रक्रियेवेळी प्रत्येक पथविक्रेता संघटनेचा एक प्रतिनिधी

नगरपथ विक्रेता समितीच्या रचनेमधील एकूण आठ प्रतिनिधींसाठी अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), अल्पसंख्याक (१), इतर मागासवर्ग (१), विकलांग (१) आणि खुला प्रवर्ग (३) अशी सदस्य रचना आहे. यापैकी एक तृतियांश म्हणजेच ३ जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. या सर्व प्रवर्गांमधून महिलांसाठीच्या ३ जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचे आयोजन महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक-२ येथे सोमवार, दिनांक २९ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. ही सोडत कामगार आयुक्त (महाराष्ट्र राज्य), मुंबई यांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होईल. तसेच सोडत प्रक्रियेवेळी प्रत्येक पथविक्रेता संघटनेचा एक प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित असेल. (Hawkers Policy)

नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर

सर्व संबंधितांना ही आरक्षण सोडत पाहता यावी, यासाठी या सोडतीचे थेट प्रक्षेपण मुंबई महानगरपालिकेशी संबंधित @MyBMCMyMumbai या यूट्यूब समाजमाध्यम खात्यावरुन करण्यात येणार आहे. तसेच पथविक्रेत्यांची निवडणूक घेण्यासाठी अंतिम करण्यात आलेली नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी ही महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये (वॉर्ड) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी दिली आहे. (Hawkers Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.