Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीतील आरक्षण जाहीर, ६४ समिती सदस्यांमध्ये २४ असतील महिला

1400
Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीतील आरक्षण जाहीर, ६४ समिती सदस्यांमध्ये २४ असतील महिला

नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून दिनांक ५ ऑगस्ट ते दिनांक २९ ऑगस्ट २०२४ या दरम्यान निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, नगरपथ विक्रेता समितीत विविध प्रवर्गांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्याची सोडत प्रक्रिया मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी २९ जुलै २०२४ रोजी पार पडली. (Hawkers Policy)

संपूर्ण मुंबई महानगरासाठी शिखर समितीसह सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ समित्यांमध्ये महिला आरक्षण निश्चितीसाठी ही सोडत आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक समितीमध्ये आठ सदस्य असतील. म्हणजेच एकूण ६४ सदस्य संख्या असलेल्या या समित्यांमध्ये खुला प्रवर्गातील ८, दिव्यांग २, अल्पसंख्याक ५, इतर मागासवर्ग ४, अनुसूचित जाती ३, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ जागा याप्रमाणे एकूण २४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. (Hawkers Policy)

(हेही वाचा – Zika Virus: पुणेकर सावध व्हा! झिका व्हायरसची झपाट्याने वाढ; एकूण रुग्णांची संख्या ४८ वर)

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम-२०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम -२०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगरपथ विक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. (Hawkers Policy)

मुंबईत १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक समितीतील सदस्यांची एकूण संख्या ८ आहे. यामध्ये अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), अल्पसंख्याक (१), इतर मागासवर्ग (१), दिव्यांग (१) आणि खुला (३) या प्रवर्गांनुसार सदस्य रचना निश्चिती करण्यात आलेली आहे. यापैकी एक तृतियांश म्हणजेच ३ जागा प्रत्येक समितीत महिलांसाठी आरक्षित आहेत. (Hawkers Policy)

(हेही वाचा – Disabled : दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप)

कामगार आयुक्त (महाराष्ट्र राज्य), मुंबई यांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली महिला आरक्षण सोडतीची प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली. सुरुवातीला शिखर समिती आणि त्यानंतर परिमंडळ स्तरावरील समितीतील आरक्षणासाठी सोडत झाली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विधी विनोद जाधव या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. (Hawkers Policy)

सोडतीनुसार, शिखर समितीमध्ये खुला, दिव्यांग आणि अल्पसंख्यांक; परिमंडळ-१ समितीमध्ये खुला, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक; परिमंडळ-२ समितीमध्ये खुला, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक; परिमंडळ-३ समितीमध्ये खुला, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती; परिमंडळ-४ समितीमध्ये खुला, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग; परिमंडळ-५ समितीमध्ये खुला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग; परिमंडळ-६ समितीमध्ये खुला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग तसेच परिमंडळ-७ समितीमध्ये खुला, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक याप्रमाणे महिलांसाठी जागा राखीव झाल्या आहेत. (Hawkers Policy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.