पालघर जिल्ह्यात नऊ दिवसांपूर्वी झिका व्हायरचा विषाणू सापडला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने कीटकनाशक तज्ज्ञांच्या टीमला झिका व्हायरस पसरवणा-या डासांना शोधण्याचे काम दिले. झिका, डेंग्यूचेही रुग्ण वाढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणात आढळून आली.
( हेही वाचा : मुंबईत येत्या शुक्रवारी एससी, एसटी वगळता ओबीसी, सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत)
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. या रोगाचा प्रसार दूषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. चिकनगुनियाच्या प्रसारासाठीही एडिस एजिप्टाय डास जबाबदार ठरला जातो. तर झिका व्हायरच्या प्रसारासाठीही एडिस एजिप्टाय डास कारणीभूत ठरतो. मात्र सगळेच एडिस एजिप्टाय डास झिका व्हायरसचा प्रसार करत नाहीत. त्यामुळे या परिसरातील सर्वच एडिस एजिप्टाय डास पकडण्याचे आव्हान कीटकनाशक टीमसमोर आहे. या डासांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले जातील. झिका व्हायरसचे निदान हे आव्हानात्मक असल्याने सध्या वैद्यकीय पथक ताप तसेच डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश लक्षणे आढळलेल्या रुग्णांचीही तपासणी करत आहे.
१४ जुलैपर्यंत पालघर जिल्ह्यांत डेंग्यूच्या ५३ केसेस सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आठवड्याभरात डेंग्यूची नवी केस पालघर जिल्ह्यात आढळली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गेल्या वर्षी २०२१ साली, डेंग्यूचे ७७ केसेस पालघर जिल्ह्यात सापडले होते. त्यातुलनेत पालघर जिल्ह्यांत डेंग्यूच्या केसेस गेल्या काही महिन्यांतच वाढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.
राज्यातील डेंग्यूचा प्रसार … (१४ जुलैपर्यंत)
कोल्हापूर – १६७, पुणे – १५७, पुणे – १४३, मुंबई – १४२ आणि सिंधुदुर्ग – १३६
डेंग्यूविषयी –
- माणसाला डेंग्यू विषाणू दूषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. कित्येकदा हा काळ ३ ते १० दिवसांचाही असू शकतो.
- हा डास दिवसा चावणारा असून, तापाचा प्रसार मानव-डास-मानव असा आढळून येतो.
- डेंग्यू ताप, रक्तस्त्राव डेंग्यू ताप आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम असे तीन डेंग्यूच्या तापाचे प्रकार आढळून येतात. रक्तस्त्राव डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोम हा तीव्र प्रकाराचा रोग आहे. यामध्ये मृत्यूची शक्यता आहे.
- या डासाची उत्पत्ती घरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
लक्षणे –
- अचानक शरीरात वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे
- कित्येकदा सुरुवातीला शरीरात तीव्र ताप आल्यानंतर डोकेदुखी, भूंक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी अशी लक्षणे एकत्र दिसून येतात
- क्वचितप्रसंगी शरीरावर पुरळ दिसून येतात
- नाकातून, हिरड्यांतून किंवा गुदद्वारातून रक्तस्त्रावही होतो
निदान व उपचार
- रक्तजल चाचणीतून डेंग्यूचे निदान होते. डेंग्यूवर निश्चित औषधोपचार नाहीत. रुग्णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि
- प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.
- डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास त्या रुग्णआला संपूर्ण विश्रांती द्यावी
- रुग्णाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी तापाच्या आजारावर औषधे द्यावीत.
- रुग्णाला फळांचा रस तसेच ओ.आर.एस.चे द्रावण द्यावे
- वैद्यकीय आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण
प्रतिबंधात्मक उपाय
- आठवड्यातून एकदा किमान घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत
- पाणी साठवलेल्या सर्व भांड्यांना योग्य पद्धतीने झाकण लावावे
- घराभोवती जागा स्वच्छ आणि कोरडी करावी
- घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसलेले टाकाऊ साहित्य ठेऊ नये