सरकारच्या Digilocker वर आता ‘हेल्थ लॉकर’ सुविधा; कुठेही पाहता येतील आरोग्यविषयक नोंदी

डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकृत व्यासपीठ आहे. डिजीलॉकरवर आपण आपली सर्व वैयक्तिक सरकारी कागदपत्र स्टोअर करू शकतो. वैयक्तिक कागदपत्रांसोबतच आता यापुढे आपल्याला डिजीलॉकरवर वैद्यकिय कागदपत्र सुद्धा सुरक्षित ठेवता येतील. लसीकरण रेकॉर्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅब चाचण्यांचे अहवाल, रूग्णालयातून घरी पाठवताना दिलेल्या वैद्यकीय अहवालाचा सारांश इत्यादी आरोग्य नोंदी संग्रहित करण्यासाठी आणि ही माहिती पुन्हा गरजेनुसार पाहता येण्यासाठी आपण डिजीलॉकरचा वापर ‘हेल्थ लॉकर’ म्हणून करू शकणार आहोत.

( हेही वाचा : देशातंर्गत २०लाख, तर विदेशातील शिक्षणासाठी मिळणार ३०लाख कर्ज; विद्यार्थ्यांसाठी सरकारची विशेष योजना!)

डिजीलॉकरचा आता वैयक्तिक आरोग्य नोंदी (पीएचआर) अ‍ॅप म्हणून वापर करता येणार आहे. या व्यतिरिक्त, एबीएचए धारक त्यांच्या आरोग्य नोंदी विविध रुग्णालये आणि प्रयोगशाळांमधून एबीडीएम नोंदणीकृत आरोग्य सुविधा लिंक करू शकतात आणि ते डिजीलॉकरद्वारे हव्या त्यावेळी पाहू, वापरू शकतात. वापरकर्ते अ‍ॅपवर त्यांचे जुने आरोग्य रेकॉर्ड स्कॅन आणि अपलोड करू शकतात. हेल्थ लॉकर सेवा आता डिजीलॉकरच्या सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झालेली आहे.

याविषयी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले, “एबीडीएम अंतर्गत, आम्ही एक आंतर-कार्यक्षम आरोग्य परिसंस्था तयार करत आहोत. डिजिलॉकर हे मूळ दस्तऐवज पाहण्यासाठी एक विश्वसनीय आणि लोकप्रिय अ‍ॅप आहे. वापरकर्त्यांना आता ते हेल्थ लॉकर अ‍ॅप म्हणून वापरता येईल आणि कागदविरहीत नोंदी ठेवण्याचे फायदे मिळतील.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here