राज्यात वाढत्या गोवरच्या पार्श्वभूमीवर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शोधण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मंगळवारी टास्कफोर्ससह विविध पालिका तसेच स्वराज संस्थांच्या अधिका-यांना दिलेत. लसीकरणापासून अद्याप दूर असलेल्या बालकांना शोधून या मुलांचे दोन टप्प्यांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबवली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले.
( हेही वाचा : वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणालची राज्य स्तरावर ‘सुवर्ण’ कामगिरी, आता लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धा)
राज्यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गोवर टास्क फोर्सच्या मते, मुंबई महानगरपालिकेव्यतिरिक्त राज्यात अन्यत्र कुठेही लसीकरण मोहीम वेगाने दिसून आली नाही. संशयित मुलांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी इतर ठिकाणी अनास्था दिसून आली. याबाबत टास्क फोर्सने खेदही व्यक्त केला. गोवर टास्क फोर्सने केलेल्या शिफारशीनुसार, राज्यातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणा लसीकरण मोहिमेत राबवणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य अधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. खांदारेही उपस्थित होते. विशेष लसीकरण मोहीम तत्परतेने राबवा, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.
विशेष लसीकरण मोहीम
पहिल्या टप्प्यात १५ डिसेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान राबवली जाईल. गोवर रुबेला लसीकरणाचा डोस चुकलेल्या ९ महिने ते ५ वर्षांच्या मुलांना शोधून त्यांचे लसीकरण केले जाईल.
दुस-या टप्प्यात चार आठवड्याच्या अंतराने लसीकरण केले जाईल. ही लसीकरण मोहीम १५ ते २५ जानेवारी दरम्यान राबवली जाईल.
- राज्यात गोवरचा उद्रेक झालेली ठिकाणे – १०९
- राज्यातील गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या – १३ हजार ५०९
- राज्यातील निश्चित गोवरच्या रुग्णांची संख्या – ८५९
- गोवर प्रभावित भागांत एकूण कार्यरत सर्वेक्षण पथके – १ हजार २३७
- आतापर्यंत सर्व्हेक्षण केलेली घरे – १४ लाख ८३ हजार ३९९
- अ जीवनसत्त्वाची मात्रा दिलेल्या बालकांची संख्या – ३६ हजार ३९९
- गोवर रुबेला लसीकरणाचा पहिला डोस मिळालेल्या बालकांची संख्या – १५ हजार ४९०
- गोवर रुबेला लसीकरणाचा दुसरा डोस मिळालेल्या बालकांची संख्या – ९ हजार २७७
Join Our WhatsApp Community