Health Sector : आरोग्यसेवेला हिंसाचाराची लागण एक गंभीर समस्या

केवळ कायदे लागू केल्याने हिंसाचाराच्या घटना थंबणार नाहीत. त्यासाठी आरोग्य संस्थांनी संबंधित सर्व घटकांना यामध्ये सामावून घेतले पाहिजे, आणीबाणीसारख्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी करावी. त्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)तयार करावी लागेल.

135
  • प्रवीण दीक्षित

सध्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना मारहाण होणे, रुग्णालयांची तोडफोड होणे, रुग्णांच्या नातेवाईकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण होणे असा आरोग्य क्षेत्रात (Health Sector) हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यावर प्रशासन विविध उपाययोजना करते, पण समस्येचे निवारण होताना दिसत नाही. आजही कुठे ना कुठे अशा घटना घडताना दिसत आहेत. यावर आता रुग्णालयात सशस्त्र सुरक्षा तैनात करणे, अद्ययावत संपर्क यंत्रणा सिद्ध करणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे याशिवाय आरोग्य क्षेत्रातील हिंसाचार रोखण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

तुरूंगात टेलिमेडीसीन

तुरूंगातील धोकादायक कैदी हे सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयात दीर्घकाळ राहावयास मिळावे म्हणून आरोग्य क्षेत्रातील (Health Sector) कर्मचारी आणि अधिकारी यांना धमकावत असतात. प्रसंगी ते शिवीगाळ करतात, मारहाणही करतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात सल्लागार (2016-17) असताना मी यावर उपाय म्हणून टेलिमेडीसिन उपलब्ध करून देण्यासाठी कारागृहांना थेट जिल्हा न्यायालयाशी संपर्क साधण्याकरिता व्हिडिओ लिंक उपलब्ध करून दिली. ही प्रक्रिया 2017 ते 2020 पर्यंत सुरू होती. तुरुंगातील डॉक्टरांना कैद्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली.

डिजिटल पोस्टमॉर्टेम

नातेवाईक पोस्टमॉर्टेम करण्याचे टाळत असतात तेव्हा डिजिटल पोस्टमॉर्टेम किंवा व्हर्च्युअल पोस्टमॉर्टेम करण्याचा पर्याय असू शकतो जेणेकरून अचूक कारणमीमांसा होवू शकते.

खासगी रुग्णालये

खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण मरण पावला, तर त्याचे नातलग आरोग्य कर्मचाऱ्यांना काहीवेळा धमकावतात किंवा काही मागण्याही करतात. यामध्ये काहीवेळा स्थानिक पुढारीही सहभागी असतात. त्यामुळे काही डॉक्टरांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावे.

या समस्येवर कायद्याच्या दृष्टिकोनातून अधिक कडक तरतुदी करण्यात याव्यात, सशस्त्र संरक्षण देण्यात यावे. तसेच आरोग्य क्षेत्रात (Health Sector) कार्यरत कर्मचार्‍यांना नियमित प्रशिक्षण देणे, कडक सुरक्षाव्यवस्था करणे, सीसीटीव्ही बसवणे आणि त्यांचे ऑडिट करणे. रुग्णाला भेटायला येणाऱ्यांची संख्या मर्यादित करणे.

(हेही वाचा Human Trafficking : मानवी तस्करी रोखायची असेल, तर महाराष्ट्र पॅटर्न राबवावा!)

पुणे येथील प्रसिद्ध अस्थिभंगतज्ञ डॉ. संचेती यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये विश्वास नसणे यामुळेही आरोग्य क्षेत्रातील (Health Sector) कर्मचार्‍यांप्रति हिंसाचाराच्या घटना घडत असतात. त्यामुळे डॉ. संचेती यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातलग यांच्याशी सुसंवाद साधून अशा घटना होण्यापासून टाळले. डॉ. संजय गुप्ते यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णामधील सुधारणा ही डॉक्टर आणि रुग्ण या दोघांच्या सांघिक प्रयत्नाचा भाग आहे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग मॉड्यूल बनवले आहे. ज्यावर अनेक रुग्णालयांनी अंमलबजावणी केली.

यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबर ऑर्गनायझेशन सेफ्टी अँड हेल्थ केअर फॅसिलिटी यांनी आरोग्य क्षेत्रातील हिंसाचार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली, जी ऑनलाईन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये रुग्णालय व्यवस्थापन, आरोग्य कर्मचारी यांची भूमिका यांविषयी सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)ची गरज 

इंडियन मेडिकल असोसिएशनने सार्वजनिक आणि खाजगी हेल्थ केअरमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, समस्या निवारण करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार व्यवस्था निर्माण करणे इत्यादी विषयांवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) वर अमलबजावणी करण्याची गरज आहे.

सध्या इंडियन मेडिकल असोसिएशनने तालुका किंवा जिल्हा पातळीवर आपत्ती निवारण समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यामध्ये डॉक्टर, समाजसेवक, कायदे तज्ज्ञ, राजकारणी आणि पत्रकार यांचा समावेश असेल. ही समिती आरोग्य क्षेत्रातील (Health Sector) कर्मचार्‍यांसंबंधी घडलेल्या मारहाणीच्या प्रसंगांवर पोलिसांसोबत काम करेल. ही समिती पत्रकारांनाही घडलेल्या प्रसंगांविषयी संवेदनशीलता बाळगण्याविषयी सूचना करेल.

सर्वोच्च न्यायालयाने मार्टिन डिसूझा वि. महंमद इस्फाक या निकालात जेकोब मॅथ्यू प्रकरणात डॉक्टरांची छळवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांना कडक शब्दांत निर्देश दिले आहेत. परिवहन मंत्रालयानेही आदेश दिले आहेत की, आरोग्य कर्मचार्‍यांनी जे जखमी येतात त्यांना तातडीने सेवा पुरवणे, पोलिसांनीही त्यांच्याकडे संशयाने पाहू नये, जीव वाचवणे याला प्रथम प्राधान्य द्यावे.

सर्व संबंधितांकडून या निर्देशांवर आणि मार्गदर्शक तत्त्वे यांवर अमलबजावणी करावी. तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनीही आत्मपरीक्षण करून कार्यपद्धतीत सुधारणा करावी, त्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा, जेणेकरून संभाव्य हिंसाचारी घटनांवर प्रभाव पडेल.

आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे 

आरोग्य क्षेत्रातील (Health Sector) हिंसाचारी घटनांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील कोअर इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लीगल मेडीसीनने निवृत्त पोलीस अधिकार्‍यांसह शीघ्र प्रतिसाद दल तयार केले आहेत. गर्दी नियंत्रण आणि जमावाच्या मानसशास्त्र यावर कुशल असलेली ही पथके आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देतात. यासाठी खाजगी रुग्णालयांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.

शेवटी केवळ कायदे लागू केल्याने हिंसाचाराच्या घटना थंबणार नाहीत. त्यासाठी आरोग्य संस्थांनी संबंधित सर्व घटकांना यामध्ये सामावून घेतले पाहिजे, आणीबाणीसारख्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी करावी. त्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)तयार करावी लागेल.

(लेखक माजी पोलीस महासंचालक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.