तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कच-याचा ढीग

रात्रंदिवस अखंड प्रयत्न करुन या सर्व चौपाट्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली आहे.

76

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने खवळलेल्या समुद्रातून मुंबईतील सात चौपाट्यांवर चार दिवसांत सुमारे १५३ मेट्रिक टन कचरा किनाऱ्यांवर आला होता. संपूर्ण महानगरात स्वच्छतेची नियमित कामे उरकत असताना, या सातही चौपाट्यांवरील कचरा देखील तातडीने हटवून चौपाट्या पूर्ववत स्वच्छ करण्याची कार्यवाही महापालिकेने रात्रंदिवस प्रयत्न करुन पूर्ण केली आहे.

चौपाट्या स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ आणि गोराई या प्रमुख सात चौपाट्या आहेत. या सात चौपाट्यांची मिळून एकूण लांबी ३६.५ किलोमीटर इतकी आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ असणा-या या सातही चौपाट्यांची नियमितपणे स्वच्छता महापालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात येते. ही स्वच्छता राखण्यासाठी २४ तास तत्त्वावर कार्यरत राहणारी यंत्रणा आवश्यक त्या संयंत्रांसह व मनुष्यबळ तैनात करुन नेमली आहे. यामध्ये चौपाटी स्वच्छता करण्यासाठी विशेष संयंत्रे जोडलेले ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, २४० लीटर क्षमतेचे कच-याचे डबे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. किना-यांवर सातत्याने येणारा कचरा नियमितपणे हटवून स्वच्छता ठेण्यासाठी होत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे चौपाट्या सदैव स्वच्छ राहत आहेत.

IMG 20210520 WA0017

(हेही वाचाः तौक्तेच्या प्रभावाने मुंबईत इतक्या झाडांची पडझड)

वादळातही सफाईचे काम सुरू

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र खवळल्यानंतर मुंबईतील सातही चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आलेला आढळला. वादळाची तीव्रता असतानाही १५ ते १८ मे २०२१ या चारही दिवशी नियमितपणे चौपाट्यांवर स्वच्छता करण्यात आली. त्यात कोणताही खंड पडला नाही. तौक्तेच्या प्रभावाखाली असलेल्या चारही दिवसांत, सातही चौपाट्यांवर मिळून १५३ मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला आहे. रात्रंदिवस अखंड प्रयत्न करुन या सर्व चौपाट्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली आहे.

IMG 20210520 WA0018

चार दिवसांतील उचललेला कचरा

१५ मे २०२१ः ३३ हजार ११० किलोग्रॅम
१६ मे २०२१ः ३९ हजार ६१० किलोग्रॅम
१७ मे २०२१ः १९ हजार १०० किलोग्रॅम
१८ मे २०२१ः ६२ हजार ०१० किलोग्रॅम

(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.