Heavy Rain : पंपिंग स्टेशनची व्यवस्था, तरीही तुंबले मिलन, अंधेरी, हिंदमाता आणि गांधी मार्केटच्या परिसरात पाणी

784
Heavy Rain : पंपिंग स्टेशनची व्यवस्था, तरीही तुंबले मिलन, अंधेरी, हिंदमाता आणि गांधी मार्केटच्या परिसरात पाणी
  • सचिन धानजी,मुंबई

मुसळधार पावसात पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा याकरता मुंबई महापालिकेच्यावतीने हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणी अतिरिक्त पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली आहे, तसेच गांधी मार्केट परिसरातील पाण्याच्या निचरासाठी मिनी पंपिंग स्टेशनचीही व्यवस्था केली आहे. परंतु पाण्याची टाक्या तसेच मोठ्या आणि छोट्याप्रकारच्या पंपिंग स्टेशनची व्यवस्था केल्यानंतरही याच परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडल्याने यासाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. (Heavy Rain)

मुंबईत रविवारी मध्य रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, गांधी मार्केट, वडाळा स्थानक आदी भागांमधील पाण्याचा निचरा होण्यास विलंब झाला. परिणामी हा भाग जलमय झाल्याने या भागातील वाहतूक मंदावली होती. विशेष म्हणजे गांधी मार्केट परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्यावतीने तीन वर्षांपूर्वी मिनी पंपिंग स्टेशन बनवण्यात आले. याठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यता आले आहेत. परंतु या मिनी पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरही या भागात पाणी तुंबले गेले. (Heavy Rain)

(हेही वाचा – Heavy Rain : पाणी तुंबण्याचे आणखी एक नवीन ठिकाण; का तुंबले भांडुपला पाणी, जाणून घ्या)

महापालिकेचे हेही प्रयत्न फसले

तसेच हिंदमाता व मिलन सब सेच्या परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास उशिर झाल्याने या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आसपासच्या परिसरात मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या गेल्या आहेत. भरतीच्या काळात या टाक्यांमध्ये पंपाद्वारे पाणी वळते करून आहोटीच्या काळात या टाकीतील पाणी समुद्रात सोडले जाते. परंतु अतिरिक्त टाक्यांची व्यवस्था करूनही हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणी पाणी तुंबून वाहतूक सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. मिलन सब वेच्या भूमिगत टाक्यांसाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही मागील वर्षी पहिल्याच पावसात याठिकाणी पाणी तुंबले होते, तसेच यंदाही पहिल्याच मुसळधार पावसात याठिकाणी पाणी तुंबले. मिलन सब वेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी इर्ला पंपिंग स्टेशन बनवल्यानंतरही कोणताही फायदा होत नसल्याने आता भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या, त्यानंतरही मिलन सब वेचा परिसर जलमय झाल्याचे पहायला मिळत असल्याने नक्की महापालिकेचे हेही प्रयत्न फसले गेल्याचे दिसत आहे. (Heavy Rain)

मागील दोन ते तीन वर्षांमध्ये पाऊस हा थांबून थांबून लागत असल्याने त्याचे परिणाम दिसून आले नाही, किंबहुना सलग तीन ते चार तास पाऊन न पडल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नाही. परंतु रविवारी रात्री एक वाजल्यापासून पहाटेपर्यंत सलग पाऊस पडल्याने प्रत्यक्षात या पंपिंग स्टेशनचा तेवढासा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. पाऊस जर थांबून थांबून लागला तरच मुंबईकरांना या पंपिंग स्टेशनचा उपयोग होऊ शकतो, हे मागील दोन ते तीन वर्षांमध्ये दिसून आले असले तरी यंदा मात्र पावसाने खरे रुप दाखवून महापलिकेने केलेली उपाय योजना किती कुचकामी आहे हे दाखवून दिले आहे. (Heavy Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.