नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार हार्बर रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील पनवेल – बेलापूर दरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर देखील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान ही वाहतूक बंद झाली आहे.
कल्याण ते कर्जत दोन्ही बाजुंची रेल्वे वाहतूक बंद
कल्याण ते कर्जत दोन्ही बाजुंची रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढला आहे. रुळावर पाणी साचल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : पावसामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक मंदावली…)
अर्धा तास वाहतूक विस्कळीत, मात्र मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभागाचे दुर्लक्ष
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मागील अर्धा तासापासून वाहतूक ठप्प असून कामाला निघालेला कर्मचारी वर्ग अडकला आहे. सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असून पनवेल स्थानकात देखील गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरही अर्धा तास मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग मात्र अनभिज्ञ होता. अखेर अर्ध्या तासानंतर रेल्वेने लोकलची सेवा विस्कळीत झाल्याचे जाहीर केले. काही ठिकाणी लोकल प्रचंड उशिराने धावत आहे मात्र काही ठिकाणी बंद पडलेल्या आहेत.
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community