चिपळूण तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस! दापोलीही पाण्याखाली! 

मागील १६ तासांपासून चिपळूण आणि दापोली तेथे मुसळधार पाऊस कोसळत आहे.

72

दीड महिन्यापूर्वी ढगफुटी होऊन चिपळूण शहर, खेड येथे पूर आला होता. त्यामध्ये शेकडोंचे संसार पाण्याखाली गेले होते, त्यांचीच पुनरावृत्ती होते का, अशी भीती पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यातील नागरिकांना भेडसावत आहे. कारण सोमवारी रात्रभर या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच दापोली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आता दापोली पाण्याखाली गेले आहे. तसेच खेड, चिपळूण बाजारपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत.

१६ तासांपासून मुसळधार पाऊस

यावेळी मुसळधार पावसाने दापोली तालुक्यातील बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री पाणी भरले. परिणामी दापोलीकरांनी रात्र जागून काढली. रात्रभर मुसळधार पावसाचे थैमान सुरूच होते. दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच शहरात एवढ्या प्रमाणात पाणी साचले, असे बोलले जात आहे. मागील १६ तासांपासून चिपळूण आणि दापोली तेथे मुसळधार पाऊस कोसळत आहे.

वाशिष्ट नदीची चिंता!

मागील पुरामध्ये वाशिष्ट नदीचे रौद्र रूप कारणीभूत ठरले. त्यामुळे आताही पुन्हा एकदा वाशिष्ट नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. परंतु अद्याप नदीने धोक्याची पातळी ओलांडली नाही. तरीही नदीतील पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती वातावरण पसरले आहे. वाशिष्ट नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती आणि मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केले आहे.

गणेशोत्सवात विघ्न?

गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर विघ्न येणार आहेत. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.