Mumbai Heavy Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

198

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत (Mumbai Heavy Rain) असून रविवारी, 21 जुलै रोजी सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दादर, वरळी या भागांत पावसाने  दमदार   हजेरी लावली. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व पावसाचा जोर (Mumbai Heavy Rain) पाहता नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच खबरदारी घ्या व आपत्कालीन परिस्थितीत #१०० डायल करा, असेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. सततच्या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून अंधेरी पंप हाऊस परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.

राज्यात कुठे कशी असणार पावसाची स्थिती? 

२२ जुलै या दिवशी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पाच जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २३ जुलै या दिवशी केवळ रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून  कोकणातील इतर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा वगळता कोणत्याच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.