मुंबईत कोसळधार!

पुढील २४ तासांत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

63

मागील दीड महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी, १५ जुलै मध्य रात्रीपासून मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या शहरांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, विरार या ठिकाणी अनेक सखल भागांत पाणी साचले. त्याचा लोकल आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मागील २४ तासांत सांताक्रूझ येथे २५३ मिमी पावसाची नोंद झाली, तर काही अंतरावर असलेल्या कुलाबा भागात ५३ मिमी पावसाची नोंद झाली.

सखल भाग पाण्याखाली!

मुंबईत चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, सायन, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने दिसून आले. अशीच परिस्थिती ठाणे, नवी मुंबईतील सखल भागांत निर्माण झाली. मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. रात्रीपासून पावसाचे धुमशान सुरु आहे. नेहमीप्रमाणे दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचले. सायन, कुर्ला भागात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर लाईन ठप्प झाली. दरम्यान पावसाचा हा जोर अद्यापही कमी होत नाही, पुढील २४ तास कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

SION

( हेही वाचा : ब्रिटिशकालीन ‘देशद्रोही’ कायद्याची आता गरज आहे का? सर्वोच्च न्यायालयाकडून विचारणा)

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटे पासून पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापुर बाजार पेठेचा धोका टळला होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत होत्या, परंतु पहाटेपासून कोसळणार्‍या पावसामुळे पुन्हा आज दिवसभरात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.