नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत दुस-या दिवशी मंगळवारीही पूरजन्य परिस्थिती होती. नाशिकमधील शहर भागांत संततधार पाऊस सुरूच होता. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा मारा कमी असला तरीही पालघर आणि नाशिकमध्ये बुधवारी आणि गुरुवारीही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नाशिकमधील गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग
मंगळवारी दिवसभरात नाशिक येथील घाट परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. नाशिकमधील गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने घाट परिसरातील भागांत पाणी साचले. नाशिकमधील उमरठाणे, बार्हे, बोरगाव, मानखेड, सुरगाणा या भागांत पावसाने रुद्रावतार धारण केला होता. सायंकाळपर्यंतच सुरगाणा येथे ८० मिमी पाऊस झाला होता. त्यातुलनेत सायंकाळी सहापर्यंत पालघरमधील वाडा येथे ६८ मिमी, विक्रमगड येथे ५५ मिमी तर मोखाड्यात ५४.४ मिमी पाऊस झाला. पुण्यातील भीमाशंकर परिसरातही पावसाने थैमान घातले होते. या भागांत पाणी साचल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. रात्रीही नाशिक आणि पुण्यातील घाट परिसरात पावसाची शक्यता असल्याने खंडाळा, भीमाशंकर तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणूत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community