राज्यात पावसाचा अधूनमधून जोरदार मारा सुरु आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना विदर्भात सर्वात जास्त पावसाचा मारा सुरु होता. रायगडात तर पावसाचा ठेंगा दिसून आला तर रत्नागिरीतील सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत २ मिमी पावसाची नोंद सुरु होती. पुणे, साता-यातील अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टही सोमवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत फोल ठरल्याचेच दिसून आले.
विदर्भात चांगला पाऊस झाला
पुण्यात सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत ४.७ मिमी तर लोहगाव परिसरात ०.४ मिमी पाऊस झाला. साता-यात तर २ मिमी पाऊस झाला. रायगडात अलिबागमध्ये पाऊसच नव्हता तर साता-यातही २ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातुलनेत विदर्भात चांगला पाऊस झाला. गडचिरोलीत सायंकाळी साडेपाचपर्यंत ४९ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी सर्वात जास्त पाऊस गडचिरोलीत दिसून आला. विदर्भात इतरत्र ठिकाणी केवळ ५ ते ७ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस सुरु होता. गेल्या कित्येक दिवसांपासून केवळ हलक्या सरींसह सोलापूरकरांचा सुरु असलेला दिवस सोमवारी मात्र दिवसभर पावसाच्या संततधारेचा ठरला. सोलापूरात केवळ १२ मिमी पाऊस झाला असला तरीही सांगलीत शिडकावेच सुरु होते.
नाशिक, पालघरमध्ये येलो अलर्टचा फज्जा
पालघर जिल्ह्यात डहाणूत केवळ २ मिमी पाऊस नोंदवला गेला. डहाणूतील कमाल तापमान सोमवारचे राज्यभरातील सर्वात जास्त कमाल तापमान होते. डहाणूत ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. नाशिक जिल्ह्यात तर ०.८ मिमी पावसाची नोंद झाली.
Join Our WhatsApp Community