मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने मुंबई महानगराला बुधवार, २६ जुलै रोजी रात्री ८ ते गुरुवार, २७ जुलै रोजी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. मुंबईत मध्यरात्री २०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवार, २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी, २६ जुलै रोजी दुपारी मुंबईसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.
महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी दरडप्रवण क्षेत्रात आणि धोकादायक इमारत स्थळी आपले पथक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह तैनात ठेवावे, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी यंत्रणेला दिले आहेत. तसेच मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रत्यक्ष क्षेत्रावर दक्ष राहण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community