गेल्या काही तासांपासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत 31 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड शहरासह जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले. बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून गत चोवीस तासांत 31 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर 7 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. किनवट तालुक्यातील नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी दुपारी किनवटमधील बेलोरी नाल्यावरून एक जण वाहून गेला आहे.
सात मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक, भोकर तालुक्यातील एक आणि किनवट तालुक्यातील 5 अशा एकूण 7 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. मौ. सिंगारवाडी आणि सुगागुंडा गावालगत असलेल्या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ ते गोडजेवली, मलकाजम ते शिवणी, आप्पारावपेठ ते मलकाजम, गोडजेवली ते दयाळ धानोरा, शिवणी ते दयाळ धानोरा हा रोड पाण्यामुळे बंद आहे.
(हेही वाचा Education : मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी ऑनलाईन सुविधा बंद; हजारो विद्यार्थी चिंतेत)
दक्षता म्हणून 70 कुटुंबांचे स्थलांतर
दरम्यान मुखेड, उमरी, नायगाव, बिलोली, अर्धापूर, लोहा, कंधार, भोकर, हिमायतनगर याशिवाय नांदेड, मुदखेड, देगलुर, उमरी, माहूरमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आहे.
जीवघेणे धाडस; एक जण गेला वाहून
जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीनाले तुडूंब भरले आहेत. बेलोरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याला देखील पूर आला आहे. नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असून त्याच पाण्यातून जाण्याचे धाडस काही गावकरी करत आहेत. पुलाच्या पाण्यातून जातांना बेलोरी येथील 40 वर्षीय अशोक दोनेवार नावाची व्यक्ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. विशेष म्हणजे तिथे उपस्थित असलेले काही तरुण या पाण्यातून जाण्यास मज्जाव करत होते. पण त्यांचे न ऐकता सदर व्यक्ती तेथून गेला आणि नाल्याच्या पुरात वाहून गेला. हा सगळा प्रकार एकाने मोबाईल मध्ये कैद केला आहे. वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध प्रशासनाकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community