राज्यात रविवारी नैऋत्य मोसमी वा-यांनी संपूर्ण भाग व्यापला असताना, सोमवारपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. सोमवारी उत्तर कोणातील पालघरपासून तळ कोकणातील सिंधुदुर्गापर्यंत अतिवृष्टी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमाल तापमानात घट
मंगळवारी पालघर वगळून उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल, असे सांगण्यात येत असून, सोमवारपासून सलग चार दिवस दक्षिण कोकणात मात्र वरुणराजा दणक्यात हजेरी लावणार आहे. रविवारी पावसाच्या कामगिरीमुळे कमाल तापमानात झालेली घसरण सोमवारीही कायम राहील. रविवारी कमाल तापमानात तीन अंशाने घसरण झाली. सांताक्रूझ येथील तापमान थेट ३४.५ अंश सेल्सिअसवरुन ३१.३ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. कुलाब्यातही कमाल तापमान दोन अंशाने खाली नोंदवले गेले. रविवारी कुलाबा येथील कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
दोन्ही केंद्रांत सायंकाळी साडेपाचच्या नोंदीनुसार अनुक्रमे २.४ मिमी तर कुलाब्यात ३५.८ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवार आणि मंगळवार अतिवृष्टी झाल्यास पुढील दोन दिवसांत कमाल तापमान २७ तर किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.