महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या माहिती व मदत पुरवण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचनेनुसार हेल्पडेस्क सुरु करण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. वैद्यकीय सेवा-सुविधा, विविध विभागांची पूरक माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर रुग्णांना आणि नातेवाईकांना पर्यायाने रुग्णालय प्रशासनाला देखील सोयीचे होईल, या विचारातून मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष सुरु करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी संबंधित कार्यवाही त्वरित पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. लवकरच ही ‘रुग्ण मित्र’ हेल्प डेस्क सेवा कार्यान्वित होईल.
(हेही वाचा Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री घेणार बैठक; आंदोलकांच्या मागण्यांवर निर्णय होणार)
रुग्णालयांचे प्रवेशद्वारावर किंवा नोंदणी कक्षाजवळच सजावटीचे केबिन तयार करण्यात येईल. या भागात रुग्णांच्या मदतीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेतही प्रभूत्व असलेल्या आणि संगणकीय ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांना सकाळी तीन, दुपारी दोन व रात्री एक याप्रमाणे सत्रनिहाय कर्मचारी नियुक्त केले जातील. उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी दोन व दुपारी एक याप्रमाणे कर्मचारी उपलब्ध असतील. या कक्षामध्ये नोंदणी पुस्तिका त्याचप्रमाणे सूचना पेटीची देखील व्यवस्था उपलब्ध असेल.
Join Our WhatsApp Community