कोविड मृत्यूंची संख्या लपवणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक! मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो, असे या मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण देताना प्रशासनाने म्हटले आहे.

152

मुंबईत कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याबाबत, मुंबई महापालिका प्रशासनाकडून आभासी चित्र उभे केले जात असल्याचे आरोप प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप पूर्णपणे निराधार असून, त्याचा महापालिका प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. कोविड मृत्युंच्या नोंदी कमी दाखवणे ही स्वतःचीच फसगत करण्यासारखे आहे, त्यातून प्रत्यक्ष डोळ्यांदेखत दिसणारी स्थिती बदलता येत नाही, याचे भान आपल्याला असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

मिशन झिरो हेच लक्ष्य

जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था(आयसीएमआर) यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच मुंबई महापालिका कोविड चाचण्या व कोविड मृत्युंच्या नोंदी करत आहे. कोविड व्यवस्थापनामध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले अविरत प्रयत्न, त्याचे प्रत्यक्ष दिसत असलेले सकारात्मक परिणाम मुंबई संबंधी आकडेवारीमध्ये उमटत आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले. कोविड संसर्गाची स्थिती टप्प्या-टप्प्याने नियंत्रणात आणून ‘मिशन झिरो’ साध्य करण्याचे लक्ष्य प्रशासनाने समोर ठेवले आहे. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींसह मुंबईकरांचे देखील सहकार्य लाभत असून, त्याचा एकत्रित परिणाम म्हणून संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

(हेही वाचाः स्मशानभूमींबाहेर शववाहिकांच्या रांगा… पूर्वीच्या डॅशबोर्ड प्रणालीचा पडला विसर!)

माध्यमांतून प्रशासनावर आरोप

सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई मॉडेलचे कौतुक करत त्याचे अनुकरण करण्याचे निर्देश, एका सुनावणी प्रसंगी नुकतेच दिले आहेत. त्यापूर्वी जागतिक बँकेसह जागतिक आरोग्य संघटनेने देखील मुंबईतील कोविड व्यवस्थापनाचे जगजाहीर कौतुक केले होते, हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने कोविड मृत्युंची नेमकी आकडेवारी उजेडात आणली जात नाही, कोविड चाचण्यांच्या प्रकारांशी तडजोडी करुन संसर्गाचा दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे केले जाते, असे म्हटले आहे.

प्रशासनाने केले आरोपांचे खंडन

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत प्रशासनाकडून कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून कोविड मृत्युंचे आकडे जाहीर केले जातातच. कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर देखील त्याची नोंद असते. सरकारकडेही नियमितपणे त्याची माहिती सादर करण्यात येते. त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो, असे या मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण देताना प्रशासनाने म्हटले आहे.

(हेही वाचाः मुंबईत रुग्णसंख्या अडीच हजारांच्या खाली…)

वर्षभरात ५९ लोकांच्या चाचण्या

मुंबईतील चाचण्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही. किंबहुना चाचण्यांची संख्या वर्षभरापासून सातत्याने वाढत आहे. २०२१ या वर्षाचा विचार केला, तर जानेवारीमध्ये ४ लाख ४४ हजार ७८३, फेब्रुवारीमध्ये ४ लाख ७६ हजार २५४, मार्च ८ लाख ३८ हजार २१०, एप्रिलमध्ये १३ लाख ३१ हजार ६९७ इतक्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मे २०२० ते ७ मे २०२१ या वर्षभराच्या कालावधीमध्ये मुंबईत एकूण ५९ लाख १८ हजार ८१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या जितकी अधिक, तितके अधिकाधिक बाधितांना शोधणे अधिक सोपे, हे सूत्र लक्षात ठेवून चाचण्यांचा वेग कायम ठेवण्यात आला आल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

प्रयत्नांना कमी लेखणे उचित नाही

मुंबई महानगरात ख्यातनाम, प्रसिद्ध असे अनेक उद्योजक, विचारवंत, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते वास्तव्यास आहेत. मोठे कॉर्पोरेट विश्व मुंबईत आहे. कोविड कालावधीत आपापले सामाजिक कर्तव्य व योगदान म्हणून पुढे येऊन, यातील बहुतेकांनी महापालिकेच्या प्रयत्नांना आपापल्या परिने हातभार लावला आहे. तसेच जनजागृतीसाठी मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखणे किंवा त्यास बनवाबनवी संबोधणे उचित वाटत नाही, असेही प्रशासनाने या स्पष्टीकरणात नमूद केले आहे.

(हेही वाचाः नवीन कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी व्यवस्था करण्याचा विचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.