तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांतील नागरिकांचे स्थलांतर

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रति तास 80-90 किमी असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्येक तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे नगरपालिका मुख्याधिकारी यांना काही विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

या आहेत सूचना

वाऱ्याच्या वेगाने जुनी झाडे, फांद्या पडू शकतात, वीजेचे जुने खांब उध्वस्त होऊ शकतात, जुने होर्डिंग्ज किंवा कोणताही पक्का आधार नसलेल्या वस्तू हवेत उडू शकतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे याची खात्री करुन घ्यावी व धोकादायक वस्तू तात्काळ काढून घ्याव्यात. सखल भागात नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपातील सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात यावे. सर्व शासकीय कार्यालयांनी त्या कार्यालयांच्या खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. काच व लाकडाच्या बारीक तुकड्यांमुळे (स्प्लिंटर्समुळे) कोणालाही त्रास होऊ नये, त्या तुकड्यांमुळे कोणी जखमी होऊ नये, यासाठी काचेच्या खिडक्या व दरवाजे यांना पडदे किंवा कापड लावावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचाः मुंबईत 17 मे रोजी लसीकरण बंद… काय आहे कारण?)

हानी टाळण्यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे

याव्यतिरिक्त याआधीही देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे, नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी, सर्व यंत्रणांनी एकत्रित समन्वय साधून कोणत्याही प्रकारची मोठी हानी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

समुद्र किनारी जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतरण

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. रत्नागिरी 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग 144 आणि रायगड 2 हजार 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here