पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून अनेकदा लोकल ट्रेनचा खोळंबा होऊन प्रवाशांचे हाल होतात. रेल्वे ट्रॅकवर एका ठराविक पातळीच्या वर पाणी साचले की गाडी चालवणे धोक्याचे असते. त्यामुळे लोकल ट्रॅकवरील पाणी लवकरात लवकर बाहेर काढणे आवश्यक असते. त्यासाठीच आता पश्चिम आणि मध्य रेल्वेने मेगाप्लॅन आखला आहे.
मुंबईत रेल्वे ट्रॅकचा भाग खचला असून आजूबाजूचा परिसर उंचावल्यामुळे पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकला तलावाचं स्वरुप मिळतं. याच परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता रेल्वेकडून ट्रॅकवर एकूण 100 हाय पॉवर पंप बसवण्यात येणार असून, त्यामुळे साचलेले पाणी बाहेर फेकण्यास मदत होणार आहे.
(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
100 हाय पॉवर पंप बसवणार
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू रोड या उपनगरीय रेल्वे मार्गाची लांबी 123 किमी. आहे. त्यापैकी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान 3, दादर ते माहिम दरम्यान 26, वांद्रा ते अंधेरी 20, गोरेगाव ते बोरीवली 23 आणि भाईंदर ते विरार दरम्यान 28 असे एकूण 100 पंप बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. या कामाला सुरुवात झाली असून, 31 मे पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः पाऊस पडला म्हणून सचिन ‘ती’ मॅच खेळू शकला आणि त्याने पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला ‘धू-धू धुतला’)
मध्य रेल्वेचा मायक्रोप्लॅन
पावसाचे पाणी साचून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून सात ठिकाणी मायक्रोटनलिंग करण्यात येत आहे. विक्रोळी-कांजूरमार्ग, माटुंगा-सायन-कुर्ला आणि वडाळा-चुनाभट्टी दरम्यान हे काम करण्यात येत आहे. तसेच ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर देखील हे काम करण्यात येत आहे. याआधी सँडहर्स्ट रोड, दादर-परेल आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान अशाप्रकारे मायक्रोटनलिंग करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी याठिकाणी पाणी साचले नव्हते.
(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)