ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान… वाढतोय मृतांचा आकडा

एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 57 टक्क्यांनी वाढली असून, मृतांच्या संख्येत देखील 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाचा देखील समावेश आहे.

91

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहिल्या लाटेचा ज्या ग्रामीण भागांना फटका बसला नव्हता, त्या ग्रामीण भागांना देखील आता दुसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत देखील आता कोरोना रुग्ण वाढू लागले असून, मृत्यूचा दर देखील वाढत आहे. एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केल्यास एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 57 टक्क्यांनी वाढली असून, मृतांच्या संख्येत देखील 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाचा देखील समावेश आहे.

(हेही वाचाः मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत एप्रिल महिना ठरला ‘विक्रमवीर’! थक्क करणारी आकडेवारी)

सध्या अशी आहे मृत्यूंची टक्केवारी

राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूर जिल्ह्याचा असून, तो जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे देखील मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. सोलापूर खालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातही ऑक्सिजन तुटवडा

ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्ण वाढत असून, रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्सची समस्या देखील निर्माण झाली आहे. याचमुळे ग्रामीण भागात मृत्यूदर वाढल्याचे सांगितले जात आहे.  काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, काही सामाजिक संस्था देखील ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करत आहेत. मात्र, ही मदत देखील तोकडी पडताना दिसत आहेत.

काल अशी होती राज्याची आकडेवारी

रविवारी राज्यात 56 हजार 647 कोरोना रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला, तर तो 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. तर 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.