आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या : मार्च महिन्यातच एकूण ८७ हजार ९३८ रुग्ण

मृतांचा आकडा हा नियंत्रणात असला तरी रुग्णांचा आकडा हा आजवरच्या सर्व महिन्यांमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्याने मुंबईकरांच्या हाती स्वत:ची सुरक्षा स्वत:च राखण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला  नाही.

मुंबईत मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यांनतर यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये नोंदवली गेलेली रुग्णांची आकडेवारीही आजवरच्या तुलनेत सर्वोत्तम असल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये एकूण ८७ हजार ९३८ रुग्ण आढळले गेले. तर फेब्रुवारी महिन्यातील मृतांच्या आकड्यांच्या तुलनेत दुप्पट रुग्णांचा मृत्यू मार्च २०२१ मध्ये झाला आहे. मार्च महिन्यामध्ये २१२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा हा नियंत्रणात असला तरी रुग्णांचा आकडा हा आजवरच्या सर्व महिन्यांमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्याने मुंबईकरांच्या हाती स्वत:ची सुरक्षा स्वत:च राखण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला  नाही.

जून महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू!

मुंबईत ११ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोना संसर्ग वाढू लागला. एप्रिल २०२०मध्ये एकूण रुग्णांची संख्या ४,४४७ एवढी होती, तर २५६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतर रुग्णवाढीचा निर्देशांक चढताच राहिला. त्याबरोबरच मृत्यूचा आकडाही मनाचा ह्दयाचा उडवणारा होता. एप्रिलनंतर मेपासून रुग्णांची मासिक संख्या ३० हजारांवर पोहोचली होती. तर त्यानंतर जून महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण त्यानंतर मृत्यूची संख्या निम्म्यावर येवू लागली आणि तिथून मग मृत्यूचा आकडा कमीवर येवू लागला.

(हेही वाचा : कोरोना काळात इमारत, सोसायट्यांनी कोणती घ्यावी काळजी? वाचा महापालिकेच्या सूचना!)

दर दिवशी ८ ते ९ हजारांची रुग्ण संख्या आढळून येते!

परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्या अनुक्रमे सुमारे ५७ हजार आणि ५२ हजारांवर पोहोचली होती. पण त्यानंतर हा आकडा नोव्हेंबरमध्ये निम्म्यावर आला आणि पुढे ही रुग्ण संख्या निम्म्यावरच येत होती. मार्च २०२१ रोजी कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा झपाट्याने होवू लागला आणि रुग्ण संख्या आजवर कधीही झालेली नव्हती, तेवढी म्हणजे ८७ हजार ९३८ एवढी झाली आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक दिवशी आठ ते नऊ हजारांची रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी आढळून येत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यांमध्येही ही संख्या नियंत्रणात न आल्यास मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्येही रुग्णसंख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या ९ हजारांवर, २७ जणांचा मृत्यू

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाच मागील तीन दिवसांपासून आठ साडेआठ हजारांचा पल्ला गाठणाऱ्या रुग्ण संख्येने शनिवारी, ३ मार्च रोजी ९ हजारांची संख्या गाठली आहे. त्याबरोबरच आता मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. विशीतून तिशीच्या उंबरठ्यावर मृत्यूची संख्या पोहोचली आहे. मात्र, दिवसभरात ५ हजार ३२२ रुग्ण बरे होवून घरी परतले ही सर्वात समाधानाची बाब आहे. दिवसभरात ४३ हजार ५९७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ९०९० रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारपर्यंत ७० झोपडपटी व चाळी या कंटेन्मेंट झोन झाले असून कंटेन्मेंट इमारतींची संख्या ६८१ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४४ दिवसांवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here