मुंबईतील ‘तो’ हिमालय पुन्हा उभा राहणार… होणार साडेसात कोटींचा खर्च!

हेरिटेज वास्तू परिसरात मोडणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल साडेसात कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

तब्बल दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयाजवळील हिमालय पुलाच्या बांधकामाचा महूर्त अखेर दृष्टीक्षेपात आला आहे. या पुलाच्या बांधकामाची निविदा अंतिम करुन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. हेरिटेज वास्तू परिसरात मोडणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल साडेसात कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

पूल कोसळून झाली होती मोठी दुर्घटना

मुंबईतील या हिमालय पुलाचा भाग १४ मार्च २०१९ रोजी कोसळून मोठी दुघर्टना झाली होती. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या दुघर्टनेमध्ये पुलावरुन चालणाऱ्या ७ पादचारी रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. या पुलाचे योग्यप्रकारे ऑडीट न करता वापरास खुले करुन दिल्यामुळे, या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीटर डी.डी. देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच महापालिकेचे निवृत्त पुल विभागचे प्रमुख अभियंता व निवृत्त उपप्रमुख अभियंता यांच्यासह इतर अभियंत्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती. याबाबतचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

(हेही वाचाः कोविड मृत्यूंची संख्या लपवणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक! मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण)

१५ महिन्यांत करणार उभारणी

सव्वा दोन वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम करुन, त्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पिनाकी इंजिनिअर्स अँड डेव्हलपर्स यांची निवड करुन, एकूण ७ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट देण्याचे निश्चित केले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर पुढील कामाला सुरुवात होईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळा वगळून १५ महिन्यांमध्ये या पुलाची उभारणी केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

प्रवाशांची होते गैरसोय

हा पादचारी पूल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पादचारी पुलाला जोडलेला असल्याने, रेल्वे प्रवाशांसाठी तो अत्यंत सोयीचा ठरतो. या पुलाच्या दुघर्टनेनंतर रेल्वे प्रवाशांना डि.एन.रोड वरुन टाईम्स ऑफ इंडिया, कामा रुग्णालय, सेंट झेवियर्स कॉलेज, जे.जे. कला महाविद्यालय व आसपासच्या कार्यालयांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांना येता-जाता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. तसेच या पुलाअभावी डि.एन. रोडवरही वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने हे पूल तातडीने बांधण्याची मागणी होत होती.

(हेही वाचाः केईएम रुग्णालयातील रुग्णाला रस्त्यावर सोडले! दोन कंत्राटी कामगारांची हकालपट्टी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here