सरकारी हॉस्पिटलमध्ये हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम (एचएमआयएस) बंद असल्यामुळे रुग्णालयात सध्या रुग्णांची माहिती जतन करून लेखी नोंदी करण्यात येत आहेत. ओपीडी, औषध विभागात कमालीची गर्दी वाढली. रुग्णांच्या प्रतीक्षा कालावधीमध्येही वाढ झाली. रुग्णांच्या एक्स-रे, एमआरआय, तसेच प्रयोग शालेय तपासणी चाचण्यांच्या नोंदी कर्मचाऱ्यांना लेखी पद्धतीने कराव्या लागत आहेत. सोलापूरात सुद्धा एचएमआयएस ही यंत्रणा मागील पंधरा दिवसांपासून बंद आहे.
एचएमआयएस प्रणाली बंद
इआयटी सर्व्हिसेसतर्फे एचएमआयएस प्रणालीची सेवा राज्यभरातील १६ सरकारी रुग्णालयांना देण्यात येत होती. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांसोबत (एमईडीडी) झालेल्या कराराप्रमाणे विहित शुल्क कंपनीला मागील दोन वर्षापासून मिळाले नाही. राज्यात एकूण १०० कोटींची बिले थकीत आहेत त्यामुळे ठेकेदाराने एचएमआयएस सेवा बंद केली आहे. ही सिस्टिम बंद झाल्यामुळे राज्यातील ४५० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
( हेही वाचा : CSMT स्थानकात अपघात; रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे अतिरिक्त १० बस प्रवाशांच्या सेवेत)
कोरोना संसर्ग काळात एचएमआयएस प्रणालीने प्रभावीपणे काम केले. कोविड रिपोर्ट देखील रुग्णांना मोबाइलमध्ये पाठवण्यात आले. ही प्रणाली बंद असल्याने नोंदी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागत आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाला कोणताही मंत्री नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयाविरोधात दाद मागता येणार नाही.