डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील परेल येथील हिंदमाता चौक आणि मडके बुवा चौक पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेता या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन्ही ठिकाणी १५ पंप बसवले जाणार आहे. पुढील चार वर्षांकरता हे पाणी उपसा करणारे पंप असून या दोन्हीच भागांकरता सुमारे ३९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान आणि सेंट झेवीयर्स येथे भूमिगत टाक्या बसवून निचरा करण्यात येणार आहे. या टाक्यामंध्ये पाणी वळते करण्यासाठी हे पंप बसवण्यात येत आहे.
भरतीच्या वेळेत पाऊस पडला तर ३ ते ४ फूट पाणी साचते!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हिंदमाता, मडके बुवा चौक आदी भागात मागील वर्षी २०२० च्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ ते ४ तासाचा कालावधी लागला. समुद्रातील भरतीच्या वेळेत जर पाऊस जास्त पडला तर अनेकदा ३ ते ४ फूट पाणी साचते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित उपाययोजना म्हणून प्रमोद महाजन उद्यानात ६० हजार घनमीटर व सेंट झेवीयर्स मैदानात ४० हजार घनमीटर क्षमतेचे पाणी साठवण्याच्या टाक्या उभारण्याचे ठरवले. परंतु २०२१च्या मान्सून पूर्व कालावधी विचारात घेता या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ हजार आणि १० हजार घनमीटर क्षमतेचे पाण्याच्या टाक्या विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने एन.टी. एस. इंजिनिअरिंग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या सल्लागाराच्या अहवालानुसार हिंदमाता परिसरात ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे १० पंप आणि मडके बुवा परिसरात ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे ०५ पंप बसवण्याची शिफारस केली आहे.
(हेही वाचा : मुंबई महापालिकेने खरेदी केले १,२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटर!)
‘या’ कालावधीसाठी बसवण्यात येणार पंप!
हिंदमाता परिसरातील १० पैकी ०८ पंप हिंदमाता पुलाखाली बसविण्यात आलेल्या पिट मधील पाणी उपसा करून १२०० मि. मी रायझिंग वाहिनीतून प्रमोद महाजन उद्यान टाकीत सोडण्यात येईल. आणि दोन पंप उद्यानातील टाकीत जमा झालेले पाणी दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्ग येथील पावसाळी पाणी वाहून नेण्याऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येईल. मडकेबुवा चौक परिसरातील असणाऱ्या ५ पंपापैकी ३ पंप वापरात असलेल्या पिट मधील पाणी उपसा करून ९०० मि.मी व्यासाच्या रायझिंग वाहिनीतून सेंट झेवीयर्स टाकीत सोडण्यासाठी तर २ पंप हे या टाकीतून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. हे पंप १ जून २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधी साठी बसवण्यात येणार आहे. यासाठी म्हाळसा कन्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून या चार वर्षांसाठी ३४ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार आहे.
Join Our WhatsApp Community