आता ‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदीची मागणी, कारण…

97

अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदु धर्मातील मृत्यूनंतर प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब करणार्‍या ‘चित्रगुप्त’ देवता आणि मृत्यूनंतर आत्म्याला घेऊन जाणारी ‘यमदेवता’ यांना आधुनिक स्वरूपात दाखवले आहे. त्यांच्या तोंडी फालतू विनोद दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्मातील चित्रगुप्त आणि यम देवता यांची टिंगल आम्ही कदापि सहन करणार नाही. सेन्सॉर बोर्ड हा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत झोपले होते का? सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध करू, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. अशा प्रकारे राष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावरून चालला होता, त्यामुळे अमीर खानला ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटावर मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

हिंदू धर्मातील संकल्पनांवर विनोदनिर्मिती 

या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या धार्मिक संकल्पना आणि देवता यांची टिंगल करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील काही दृष्ये अन् संवादच समोर आले आहेत. प्रत्यक्षात पूर्ण चित्रपटात आणखी आक्षेपार्ह संवाद असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात अजय देवगण यांना सुट-बुट घातलेले मॉडर्न ‘चित्रगुप्त’ दाखवले असून यमदूतांना ‘वाय.डी.’ (YD) असे नावाचा अपभ्रंश करून संबोधले आहे. हिंदु धर्म शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर चित्रगुप्त त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब करतात. असे असतांना या संकल्पनेची मोडतोड करून सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याचा मृत्यू झालेला नसतांना त्याला चित्रगुप्ताच्या दरबारात नेलेले दाखवले आहे. तेथे चित्रगुप्त त्याच्याशी ‘गेम ऑफ लाईफ’ खेळताना दाखवले आहे. एकूणच हिंदु धर्मांतील एका उदात्त संकल्पनेला ‘कॉमेडी’च्या नावाखाली चुकीच्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने दाखवून त्याची टिंगल करण्यात आली आहे. यापूर्वीही ‘पीके’, ‘ओ माय गॉड’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘तांडव’ यांसारख्या अनेक चित्रपट अन् वेब सिरीज यांमधून हिंदु धर्म, देवता, साधूसंत यांना लक्ष्य केले गेले. हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी विनोद करून त्यांविषयी घृणा निर्माण केली जाते. हे सर्व रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. तसेच सेन्सॉर बोर्डामध्येही धार्मिक प्रतिनिधी असायला हवेत, जे धार्मिक भावनांचा अनादर होऊ नये, याची काळजी घेतील, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

(हेही वाचा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ‘ED’ चं ऑफिस! चर्चांना उधाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.