कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य – रणजित सावरकर

148

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हा विचार सोडून ‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा, कुणासाठीही थांबू नका. श्रीकृष्णाने सांगितले मी अवतार घेईन, हे जे लोक सांगतात हे चुकीचे आहे. जर श्रीकृष्णाला अवतार घेवून प्रत्यक्ष कृती करायची असती, तर त्याने महाभारताच्या काळातच कृती केली असती, त्याने अर्जुनाला का प्रेरित केले? लढला अर्जुन पण कृष्णाची निती आपल्याबरोबर आहे, हा त्याला विश्वास होता. म्हणून जेव्हा जेव्हा अधर्म होईल, तेव्हा तेव्हा माझ्या नीतीवर तुम्ही कृती करा, तुम्हाला यश येईल, हे श्रीकृष्णाचे म्हणणे आहे, त्याचप्रमाणे आपण धर्मरक्षणासाठी कृष्णनीतीनुसार कृती करावी लागेल. अर्जुनाप्रमाणे कृष्णनीती वापरूनच रामराज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतो, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’चे कार्याध्यक्ष  रणजित सावरकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी शहरातील मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडयेे आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक मनोज खाडयेे उपस्थित होते. या सभेला रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रारंभी सनातनचे साधक ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. त्यानंतर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु कु. स्वाती खाडये, रणजित सावरकर आणि मनोज खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोज खाडये यांनी पुष्पहार घातला. त्यानंतर वेदमंत्रपठण वेदमूर्ती केतन शहाणे, अवधूत मुळ्ये आणि रविशंकर पंडित यांनी केले. या ब्रह्मवृंदांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे विनय पानवळकर यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे जिल्हा समन्वयक विनोद गादीकर यांनी सांगितला. या सभेचे सूत्रसंचालन आनंद मोंडकर आणि नारायणी शहाणे यांनी केले.

अँड्राइड सनातन पंचांग २०२३ चे लोकार्पण

या वेळी अँड्राइड ‘सनातन पंचांग’चे लोकार्पण सद्गुरु स्वाती खाडयेे, रणजित सावरकर आणि मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आले.

संत सन्मान

हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडयेे यांचा सत्कार गोसेवा संघाचे उपाध्यक्ष आणि हिंदु राष्ट्र सेनेचे चंद्रकांत राऊळ यांनी केला. या सभेला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, पू. चंद्रसेन मयेकर यांचा सन्मान सनातन संस्थेचे रत्नागिरी जिल्हासेवक महेंद्र चाळके यांनी केला. पू. रत्नमाला दळवी यांचा सन्मान सनातनच्या साधिका सुषमा सनगरे यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.