अमान्य किंवा अमान्य करण्याजोग्या विवाहातून जन्मलेली अपत्येही कायद्याला मान्य असतात. तसेच त्यांनाही हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार (HINDU SUCCESSION ACT) माता – पित्याच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार असतो. कन्येलाही अशाच प्रकारे समान अधिकार लागू होतात, असे महत्त्वाचे निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने मांडले. १२ वर्षे जुन्या याचिकेवरील खटला निकाली काढताना न्यायालयाने हिंदू वारसाहक्क कायद्याची कक्षा रुंदावणारा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान हिंदू वारसाहक्क कायद्याअंतर्गत संपत्तीच्या वारसदारांविषयीच्या कायदेशीर व्याख्येची व्याप्ती वाढविणारा हा निकाल दिला आहे. विवाहाशिवाय जन्माला आलेली अपत्ये हिंदू कायद्यानुसार आपल्या माता – पित्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे वारसदार असू शकतात की नाही ? असा प्रश्न त्या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता. ३१ मार्च २०११ रोजी न्यायालयाने ही याचिका खंडपीठाकडे वर्ग केली होती. त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने यासंदर्भातील निकाल दिला.
(हेही वाचा – Aditya-L1 : ‘हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश’, आदित्य एल-1च्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केले वैज्ञानिकांचे कौतुक)
या निकालात न्यायालयाने २ महत्त्वाचे निष्कर्ष तयार केले आहेत. पहिल्या निष्कर्षात अमान्य विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना घटनात्मकदृष्ट्या वैधता दिली जात आहे, तर हिंदू विवाह अधिनियमातील कलम १६ (३) च्या संदर्भानुसार, अमान्य करण्याजोगा विवाह रद्दबातल ठरण्यापूर्वी जन्मलेली अपत्येही वैधच ठरत असल्याचा दुसरा निष्कर्षही न्यायालयाने मांडला. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला असल्याचे सरन्यायाधिश म्हणाले. (HINDU SUCCESSION ACT)
अमान्य करण्यायोग्य विवाह म्हणजे काय ?
हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार ‘अमान्य’ विवाहसंबंधात पुरुष किंवा महिलेला पती – पत्नीचा दर्जा मिळत नाही. पण अमान्य करण्याजोग्या विवाहसंबंधात मात्र अशा जोडप्यास पती – पत्नीचा दर्जा मिळतो. ‘अमान्य’ विवाह संपुष्टात आणण्यासाठी किंवा रद्दबातल ठरविण्यासाठी आदेशाची आवश्यकता नसते. तर जे विवाहसंबंध कोणत्याही एका पक्षाच्या विनंतीनुसार रद्द ठरविले जाऊ शकतात, अशा विवाहाला ‘अमान्य करण्यायोग्य विवाह’ असे म्हटले आहे. (HINDU SUCCESSION ACT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community