हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन

96

शहरातील प्रमुख रुग्णालयांवरील रुग्णांच्या तपासणीचा ताण कमी व्हावा, तसेच लोकसंख्येवर आधारित २२७ विभागांत महापालिकेच्यावतीने सुरु होणा-या ५२ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या दवाखान्यात १४७ चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमध्ये एमआरआय तसेच मॅमोग्राफी या महागड्या चाचण्याही मोफत उपलब्ध असतील. मुंबईतील गोवरचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावीतील दवाखान्यात उपचार घेणा-या रुग्णांशी थेट तर इतर विभागांतील डॉक्टर आणि रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

 clinick2

दर २५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना उभारला जाणार

धारावीतील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ल्याजवळील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्धाटन करताना प्रत्येक विभागात तयार होणा-या या दवाखान्यांना आपला दवाखाना असे संबोधित करावे, अशा सूचना त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिल्या. ठाण्यापाठोपाठ मुंबईतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी दर २५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५२ दवाखाने सुरु झाल्यानंतर इतर दवाखानेही अल्पावधीतच सुरु केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. एकट्या धारावातील २५ हजार लोकसंख्येवर आधारित १५ दवाखाने उभारले जातील. या दवाखान्यात विविध रक्त चाचण्या तसेच औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या प्रमुख पाच रुग्णालयांवरील ताणही कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त मुंबईच्या सुशोभिकरणाचा भाग म्हणून दोन वर्षांतच मुंबई खड्डेमुक्त होईल, धारावी पुनर्विकास योजना लवकर कार्यान्वित होईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

९० ठिकाणी दवाखान्यांच्या जागा निश्चित 

दवाखान्यांची उभारणी तातडीने व्हावी, यासाठी ९० ठिकाणी जागांची निश्चिती झाल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली. वस्तीपातळीवर कोटा कॅबिन्सच्या माध्यमातून दवाखाने उभारले जातील. २२७ विभागांत मार्चपर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना मार्च महिन्यापर्यंत उभारले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दवाखान्याची वेळ 

सकाळी ७ ते २ आणि दुपारी ३ ते १०

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.