Veer Savarkar : नामशेष व्हायचं नसेल तर हवं हिंदू ऐक्य!

हिंदू आणि मुस्लिमांनी केलेली मतदानाची टक्केवारी पाहिलीत की लक्षात येईल जागं कोण आहे. अजूनही वेळ गेलेली नसली तरी, आपल्या हातात आता फार वेळ शिल्लक नाही ही वस्तुस्थिती आहे.

282
  • मंजिरी मराठे

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) म्हटलं होतं, माझी मार्सेची उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. आज स्वातंत्र्यानंतर सत्त्याहत्तर वर्षांनी सुद्धा पुन्हा एकदा हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, ती हिंदूंच्याच हिंदुस्थानातील अस्तित्वासाठी. १९४७ मध्ये देशाचे दोनच तुकडे झाले तरीसुद्धा त्या काळातल्या बहुतेक हिंदूंच्या ते जिव्हारी लागलं होतं. आज देशाचे असंख्य तुकडे होऊ घातले आहेत, तसे प्रयत्न चालू आहेत पण आपल्याला ते दिसतच नाहीत का? त्यावेळी स्वप्नाळू धोरणांचं शासन होतं, पण आज आपण सारेच स्वप्नात, धुंदीत जगतो आहोत. आपल्या पिढ्यांना स्वातंत्र्य आयतं मिळालं आहे. निद्रिस्त राहिलो तर आपण आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो हे शेकडो वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही केवळ शासनाची, आपल्या सैनिकांची जबाबदारी नसते तर स्वतंत्र देशाचा नागरिकही सजग असावा लागतो. पण आज मोबाईल, सोशल मिडिया या भस्मासुरामुळे आपली विचारशक्ती, कार्यशक्ती लयाला जाते आहे. त्यामुळे हातात जे दिसतं आहे तेच अनेकांचं विश्व झालं आहे. पण त्या हातात दिसणाऱ्या दिखाऊ जगापलीकडे एक विश्व आहे आणि त्या विश्वात हिंदूंचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे, ही जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले – रणजित सावरकर)

स्वातंत्र्यानंतर शत्रू सीमेपार तरी होते पण आज मात्र आपले शत्रू देशातच आहेत, अगदी तुमच्या आमच्या शेजारी आहेत. अगदी उघडपणे ते तुम्हाला धमक्या देत आहेत, तुमच्या दैवतांचा अवमान करत आहेत, तुमच्या ध्वजाचा अपमान करत आहेत, त्यावरून वाहनं चालवत आहेत आणि आपण क्षणिक हळहळ व्यक्त करून ते विसरूनही जात आहोत. देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर- हिंदूंचा हिंदुस्थान, मुस्लिमांचा पाकिस्तान. पण साऱ्या विश्वाचाच ‘दारूल इस्लाम’ (इस्लामचीच सत्ता) करण्याची मुस्लिमांची प्रबळ इच्छा तेव्हाही होती आणि आत्ताही आहे. त्यामुळे याचं भान येऊन, जाणीव होऊन हिंदू ऐक्यासाठी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे. हिंदू ऐक्य आपल्यासाठी अत्यंत घातक ठरेल हे ब्रिटिशांनी पक्कं जोखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. वैदिक आणि सनातनी म्हणजे हिंदू असा प्रचार करून त्यांनी प्रथम हिंदूंमध्ये दरी निर्माण केली. त्यातच भारतवासियांचा सगळ्यांचाच स्वतंत्र बाणा म्हणून आपण लढलोही वेगवेगळे, कित्येकदा तर एकमेकांविरुद्धही लढलो. त्यामुळेच सावरकरांनी (Veer Savarkar) १०१ वर्षांपूर्वी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला आणि ‘हिंदू’ म्हणजे कोण ? हे हिंदूंनाच समजावून सांगितलं. हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता, मराठी माणसापुरता मर्यादित नव्हता तर अखिल हिंदूजगतासाठी होता आणि म्हणून त्यांनी तो ग्रंथ इंग्रजीत लिहिला. सर्व हिंदूंना एका समान धाग्यात गुंफण्यासाठी त्यांनी ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या केली. वैदिक, सनातनी, आर्यसमाजी, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत, निरीश्वरवादी हे सगळे हिंदूच आहेत हे सांगणारी सावरकरांची (Veer Savarkar) व्याख्या आज मनामनांवर ठसवण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांच्या देवांची रूपं वेगळी, गुरु वेगळे, उपासना पद्धती वेगळी. पण त्यामुळे एक ‘फतवा’ निघाला आणि त्यानुसार सर्वांनी कृती केली असं आपल्याकडे घडू शकत नाही, म्हणून हिंदुहित जपणारी प्रत्येक व्यक्ती, संस्था यांनी स्वतंत्रपणे काम करतानाच एकमेकांच्या सहकार्यानं काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. मतदान हा देशातला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा झाला. हिंदू आणि मुस्लिमांनी केलेली मतदानाची टक्केवारी पाहिलीत की लक्षात येईल जागं कोण आहे. अजूनही वेळ गेलेली नसली तरी, आपल्या हातात आता फार वेळ शिल्लक नाही ही वस्तुस्थिती आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘सावरकर’ हे नुसते आडनाव राहिले नाही, तर जगण्याचा हेतू बनले; बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे गौरवोद्गार)

आज घरची दुरुस्तीची छोटीमोठी कामं करायला हिंदू माणसं मिळत नाहीत. ओला, उबर टॅक्सी चालक तुमचे नाहीत, महामार्गांवरची छोटी मोठी हॉटेल्स तुमची नाहीत. अगदी ‘शेतकरी तुमच्या दारी’ या उद्देशानं सुरू झालेले आठवडा बाजारही फक्त तुमचे नाहीत. उदाहरणच द्यायचं तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुमच्या रिक्षाचालकांची संख्या रोडावते आहे. हा दोष आपला आहे. आता वेळ आहे ती हिंदूंनी हिंदू हातांना काम देण्याची. तो बिहारी आहे असू द्या, उत्तरप्रदेशी आहे असूद्या, तो हिंदू असणं महत्वाचं आहे. हिंदूंना नामशेष व्हायचं नसेल तर हिंदुहितासाठी कोणीही आवाहन केलं तरी ते स्वत:च्याच अस्तित्वासाठी आहे हे जाणून सर्व हिंदूंनी कृतिशील होणं ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे हिंदूंनो जागे व्हा, तरुणांनो जागे व्हा, सजग व्हा आणि आपल्या हिंदुराष्ट्रासाठी जात, पात, पंथ विसरून हिंदू ऐक्य साधा! हिंदूंच्या अस्तित्वाची ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे! आत्ता नाही तर कधीच नाही..

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.