- सचिन धानजी,मुंबई
बोरीवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील स्कायवॉकबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर या स्कायवॉकच्या पहिल्या जिन्याचे बांधकाम केल्यांनतर मोक्ष मॉलसमोरील एस व्ही रोड पलिकडील जिन्याचीही डागडुजी करण्यात आली आहे. पहिल्या जिन्याची दुरुस्ती तब्बल आठ दिवसांनंतर पूर्ण केल्यानंतर मागील शुक्रवारी हाती घेतलेल्या दुसऱ्या जिन्याची डागडुजी बुधवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे बोरीवली स्कायवॉकला जोडणाऱ्या मोक्ष मॉल समोरील दोन्ही जिन्यांची डागडुजी पूर्ण करण्यात आली असून ठक्कर मॉल, बोरीवली पोलिस स्थानकसमोरील आणि भाजी मार्केटसह महापालिका विभाग कार्यालयाजवळ उतरणाऱ्या जिन्यांची डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. (Hindusthan Post Impact)
महापालिका आर-मध्य विभाग कार्यालयाच्या नाकासमोर असलेल्या स्कायवॉकवरील उखडलेल्या लाद्यांमुळे पादचाऱ्यांना धड चालताही येत नाही. पण दिसत असतानाही महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसह पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे, आणि त्यांना आता केवळ प्रतीक्षा आहे की कोणी तरी पादचारी जायबंदी होऊन पडण्याची. त्यामुळे कोणी पडून झडून जखमी झाल्यानंतरच महापालिका या स्कायवॉकची डागडुजीचे काम करणार का असा प्रश्न उपस्थित करत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने ‘महापालिका पूल विभागाच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची महापालिकेला प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. (Hindusthan Post Impact)
(हेही वाचा – Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा)
जून महिन्यातील १८ तारखेला याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून या पुलाच्या मोक्ष मॉलकडे उतरणाऱ्या जिन्याचे काम हाती घेतले. यासाठी जिन्याचा प्रवेश मार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आला. या जिन्यावर काही भागात उखडलेल्या लाद्या बसवणे हेच काम अपेक्षित होते. अगदी शुल्लक असलेल्या या कामासाठी महापालिकेने हा जिना तब्बल आठ दिवसांपासून बंद करून हे काम केले. मात्र हा जिना आता चालण्यास सुस्थितीत आला असला तरी या जिन्याच्या दुरुस्तीच्या कामांसाठी आठ दिवसांचा कालवधी घेतला. (Hindusthan Post Impact)
मात्र, या स्कायवॉकचा एसव्ही रोडच्या पलीकडच्या बाजूला मॉल समोरील बाजुस उतरणाऱ्या जिन्याची अद्यापही दुरावस्थाच होती, त्यामुळे या समोरील जिन्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेतले आणि या दुरुस्ती कामासाठी हा जिना बंद करण्यात आला होता. हा दुसरा जिनाही आता दुरुस्त करण्यात आला असू अन्य जिने अद्यापही चालण्यास सुस्थितीत नसून या जिन्यांची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Hindusthan Post Impact)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community