शिवाजीपार्कच्या त्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे काम तोडून पुन्हा बनवण्यास सुरुवात

दादरमधील सेनापती बापट चौक ते शिवाजी महाराज उद्यानपर्यंत जाणाऱ्या ज्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या कामावर जिथे तडे पडल्याचे आढळून आले होते, त्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे काम पुन्हा तोडून नव्याने बनवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हिंदुस्थान पोस्टने १५ जून रोजी शिवाजीपार्कमधील नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे या मथळ्याखाली प्रसिध्द करत या नव्याने बनवलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या कामाची पाहणी करून यामध्ये रस्त्यावर पडलेले तडे खोलवर असल्याने हे बांधकाम तोडून नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटचा भाग तोडण्यात आला आहे.

( हेही वाचा : BMC Election 2022 : एफ उत्तर विभागात प्रस्तापितांच्या जागांना धोका, कोण वाढवणार आपल्या जागा)

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील रानडे मार्गावरील सेनापती बापट चौकापासून एम बी राऊत मार्ग (दक्षिण) व केळुसकर मार्गाला छेदून जाणाऱ्या रस्त्यांचे मागील दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले होते. तर पदपथाचे काम व्हायचे असून पावसाळा पूर्ण झाल्यानंतर पदपथांचे काम केले जाणार आहे. परंतु चार ते पाच दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसून आल्या होत्या. रस्त्याच्या पृष्ठभागासह मॅनहोल्सच्या भागातही तडे पडलेले पहायला मिळत होते.

रस्त्यांचे नव्याने कॉंक्रिटीकरण करण्यात येतील

याबाबतचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रसिध्द केल्यानंतर, गुरुवारी सकाळी या तडे पडलेल्या रस्त्याच्या भागाची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अभियंत्यांना हे तडे खोलवर असल्याचे दिसून आले. त्यानुसार तीन पॅनेलचा भाग तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मॅनहोल्स असलेल्या पॅनेलचा भाग तोडण्यात आला असून त्यानंतर क्रमाने पुढील पॅनल तोडून पुन्हा रस्त्यांचे नव्याने कांक्रिटीकरण करण्यात येतील,अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

या रस्त्याच्या काही भाग तोडल्याने तो बॅरेकेट्स लावून अडवण्यात आला आहे, परंतु या रस्त्यावरील वाहतूक चालू ठेवण्यात आली आहे. मात्र, नव्याने बनवलेल्या या रस्त्याचा भाग तोडून नव्याने तिथे कामाला सुरुवात केल्याने स्थानिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराने केलेले निकृष्ट काम खपवून न घेता त्याला पुन्हा करायला लावल्याने स्थानिकांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेही कौतूक केले जात आहे.

दरम्यान, या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने दीड लाख रुपयांचा दंड आकारल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा दंड आकारला असून त्यांच्याकडून या रस्त्यांचे बांधकाम तोडून पुन्हा बनवून घेण्यात येत आहे.

शिवाजीपार्क मधील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या रस्त्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यात या हे तडे खोलवर गेल्याचे दिसून आल्याने रस्त्यांचा भाग तोडून नव्याने बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंत्राटदाराला कामाचा एकही पैसा अद याप दिलेला नसून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराची गय महापालिका प्रशासन करणार नाही. जो कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करेल त्यांच्याकडून पुन्हा नव्याने तो रस्ता बनवून घेतला जाईल.
उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सेवा सुविधा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here