किती दिवस आदळत, आपटत चालणार? फोटो काढा, आम्हाला पाठवा

हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातून मुंबईतील अनेक भागात असणा-या रस्त्यांवरील पदपथांची दुरवस्था दाखवली जाणार आहे.

168

मुंबईत पदपथ मंजूर होऊनही मुंबईतील पदपथांची अवस्था ही ‘आओ गिर पडे’ अशीच आहे. महापालिका प्रशासन कुठेही पदपथ समतल आणि तुटलेल्या, फुटलेल्या स्थितीत नसावे यासाठी प्रयत्नशील नसून, खुद्द नगरसेवकांचाही विभागातील फुटपाथच्या उखडलेल्या लाद्या व्यवस्थित कराव्यात, त्या नीट बसवाव्यात यासाठी प्रयत्न दिसत नाही.

पावसाळ्यात या उखडलेल्या लाद्या अथवा पेव्हर ब्लॉकमुळे रंगपंचमी प्रमाणे अंगावरील कपडे चिखलाच्या पाण्याने भिजतात, तर इतर मोसमांत त्यात पाय अडकून कपाळमोक्ष होण्याची वेळ येते. मात्र महापालिका प्रशासनाला आणि नगरसेवकांना या धोरणाचा विसर पडला असून, राज्याचे मुख्यमंत्री फक्त नेमक्याच पदपथांची सुधारणा करत त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांना देतात. त्यामुळे असे होत असेल तर मुंबईकरांनी काय आदळत, आपटत चालायचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः साडेपाच वर्षांत पदपथांची सुधारणा किती?)

काय आहे सुधारित धोरण?

मुंबईतील पदपथ हे चालण्यासाठी सोयीचे, सलग, समतल व सुकर असावेत यासाठी स्वतंत्र धोरण बनवून अंमलबजावणी करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डिसेंबर २०१६मध्ये घेतला. त्यामुळे नवीन पदपथ हे सुधारित धोरणानुसारच बनवणे अपेक्षितच आहे. तसे झाल्यास टप्प्या-टप्प्याने सध्या असलेल्या ’पेव्हर ब्लॉक’च्या पदपथांचे रुपांतर हे सिमेंट-कॉन्क्रीटच्या पदपथांत केले जाईल, असा विश्वास तत्कालीन आयुक्तांनी व्यक्त केला.

प्रशासनाला पडला विसर

मात्र, अजोय मेहता यांची बदली झाल्यानंतर त्यानंतर आलेले प्रविणसिंह परदेशी आणि सध्याचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना याचा विसर पडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि नगरसेवकही आता पदपथांचे धोरण विसरल्याने मुंबईकरांना आजही तुटक्या फुटक्या लाद्यांवरुन चालत आदळत, आपटतच चालावे लागत आहे.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

‘हिंदुस्थान पोस्ट’ आवाज उठवणार

त्यामुळे मुंबईकरांच्या या समस्येबाबत आता हिंदुस्थान पोस्ट आवाज उठवणार आहे. हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातून मुंबईतील अनेक भागात असणा-या रस्त्यांवरील पदपथांची दुरावस्था दाखवली जाणार आहे. एवढेच नाही तर आपल्या भागातील पदपथांची दुरुस्ती वेळेवर न करणाऱ्या स्थानिक नगरसेवकांचे नाव त्यासोबत प्रदर्शित केले जाणार आहे.

या क्रमांकांवर फोटो करा व्हॉट्सअप  

त्यामुळे आपल्या विभागातील कुठल्याही रस्त्यावरील पदपथ चालण्यास योग्य नसतील, लाद्या उखडलेल्या असतील, समतल नसतील तर त्यांचे फोटो रस्त्याच्या आणि विभागाच्या नावासह ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या 8591886226/9324321033 या व्हॉट्सअप क्रमांकांवर पाठवावेत. पदपथांची छायाचित्र पाठवताना विभागाचा अचूक पत्ता आणि स्थानिक नगरसेवक अथवा नगरसेविका यांचे नाव लिहिण्यास विसरू नये.

(हेही वाचाः रस्ते सुरक्षेचे होणार ऑडीट: महापालिका प्रथमच नेमणार ऑडीटर!)

मुंबईकरांना चालण्यासाठी चांगल्या दर्जाचे पदपथ उपलब्ध व्हावेत या करताच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचा यामागे हेतू नाही, हे लक्षात घ्यावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.