मुंबईतील Hit And Run च्या घटना वाढल्या; २०२३ मध्ये रस्ते अपघातात ३५१ जणांचा मृत्यू 

129

Hit And Run : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा भरधाव वेगाने एका निरागस चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली. भरधाव वेगात जाणाऱ्या एका चारचाकीने फुटपाथवर झोपलेल्या मायलेकाला चिरडले. या गाडीच्या धडकेत वरदान निखिल लोंढे या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची त्याची आई प्रिया लोंढे ही गंभीररीत्या जखमी झाली. या अपघाताने (Vehicle accident) पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना घडत असून याच संदर्भातील मुंबई वाहतूक पोलिसांची (Mumbai Traffic Police) समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. (Hit And Run)

मुंबईतील रस्ते अपघातांबद्दल प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये हिट अँड रनच्या घटना ३८ टक्के होत्या. या अहवालानुसार अपघातातील ५४ टक्के पीडित हे पादचारी होते. या अपघाताच्या आकड्यांचे अधिक विश्लेषण केले तर २०२३ मध्ये रस्ते अपघातात ३५१ जणांचा मृत्यू झाला.

ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीच्या (Bloomberg Initiative for Global Road Safety) सहकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकताच हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, या अपघातांमध्ये दुचाकी आणि तीन चाकीवरील अपघातग्रस्तांचे प्रमाण हे ४८ टक्के तर चालत जाणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के होते. या आकड्यांनुसार, अपघातातील ८२ टक्के मृत्यूंसाठी पुरुष सर्वाधिक जबाबदार आहेत. २० – ३९ वयोगटातील ४७ टक्के पुरुषांमुळे अपघात होतात. या आकडेवारीचा हवाला देत एका अधिकाऱ्याने सांगितले की, या रस्ते अपघातात मृत्यू झालेले सर्वाधिक दुचाकी स्वार हे २०-२९ या वयोगटातील होते. या अपघातांमध्ये हिट अँड रनचे (Mumbai Hit And Run Case) प्रमाण ३८ टक्के आहे. यातील जवळपास ५४ टक्के पादचाऱ्यांना याचा फटका बसला. अनेक पादचाऱ्यांचा मृत्यू हा सायन-पनवेल महामार्ग, घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड आणि वरळी सीफेस जंक्शन अशा जोडरस्त्यांवर झाला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन-बांद्रा लिंक रोड आणि बैंगनवाडी सिग्नल जंक्शन, या जोडरस्त्यावर सर्वाधिक अपघाती मृत्यू तसेच जखमी झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर प्रति किमी. सर्वाधिक मृत्यू झाले. 

(हेही वाचा – ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन)

या आकड्यांच्या भाषेत २०२३ मध्ये या रस्त्यांवर प्रति किमी. १० मृत्यू झाले आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी देखील या अहवालात काही उपाय सुचवण्यात आले आहेत. यात गाड्यांचा वेग कमी ठेवणे, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट, गाड्यांसाठी सीट बेल्ट, पादचाऱ्यांसाठी सुरक्षा आणि सायकलस्वारांसाठी देखील काही गोष्टींची तरतूद करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.