Hoarding Accident : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोटिसचे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना

732
Hoarding Accident : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोटिसचे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना
मुंबई महानगरात जाहिरात फलक (होर्डिंग्ज) बाबत  महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचे तसेच आकारांबाबत निर्देशांचे पालन रेल्वे प्रशासनाने करणे आवश्यक आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने  १५ मे २०२४ रोजी बजावलेल्या नोटिसांचे देखील रेल्वे प्रशासनाला तंतोतंत पालन करावेच लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (Hoarding Accident)
घाटकोपर मधील छेडानगर परिसरात दिनांक १३ मे २०२४ रोजी जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली. लोहमार्ग रेल्वे पोलिसांच्या अखत्यारितील हद्दीत घडलेल्या या घटनेच्या याअनुषंगाने मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्‍वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, या आशयाची नोटीस  महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३० (२) (व्‍ही) अन्‍वये व मुंबई जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष या नात्‍याने अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिनांक १५ मे २०२४ रोजी बजावली होती. (Hoarding Accident)
आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने दिले ‘हे’ निर्देश 
मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही. असे असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महानगरपालिका रस्‍ते तथा खासगी जागा बांधकामे यांच्‍या लगतच्‍या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचे आढळून आले आहे. हे पाहता घाटकोपरमध्‍ये घडलेल्‍या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा ओढावू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीतील ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्‍याचे निर्देश मुंबई जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने देण्‍यात आले आहेत. (Hoarding Accident)
मात्र, रेल्वेने या नोटिस तसेच जाहिरात फलकांच्या आकारांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. त्यावर, न्यायालयाने १० जुलै २०२४ रोजी सुनावणी घेऊन निर्देश दिले की, महानगरपालिकेचे जाहिरात फलकांबाबतचे धोरणानुसार फलकांचे आकार आदी बाबींचे रेल्वेला पालन करावे लागेल. तसेच जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने बजावलेल्या नोटिसांचे देखील पालन करणे आवश्यक आहे. (Hoarding Accident)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.