राज्यात विशेषत: मुंबई ठाण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे महापालिकेने उपाय म्हणून गृहसंकुलांसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. एखाद्या सदनिकेत कोरोना बाधित उपचार घेत असल्यास संबंधित एका रुग्णामुळे संपूर्ण सोसायटीवर निर्बंध नकाेत असे अनेक पदाधिकाऱ्यांचे मत होते याच पार्श्वभूमीवर पालिकेने नवी नियमावली जारी केली आहे.
महापालिकेच्या सूचना
कोरोना रुग्णाचे नातेवाईक अथवा संपर्कात आलेले लोक लक्षणे असणारे लोक यांनी तपासणी करण्यास टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास कोरोनारुग्णाची सदनिका सात दिवसांसाठी बंद राहील. कोरोनाची लक्षणे नसल्यास पॉझिटिव्ह अहवाल आल्याच्या तारखेपासून पाचव्या ते सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी करणे बंधनकरक असणार आहे. गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांना सेवा देणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे.
( हेही वाचा : काय सांगताय! आता रेल्वे स्टेशनवर आधार, पॅनकार्ड, तिकीटासह विमाही काढता येणार )
संपूर्ण इमारतीऐवजी बाधित रहिवाशांना अटी
विलगीकरण केलेल्या कोरोनाग्रस्त कुटुंबाला इमारतीमधील इतर सदस्यांनी मदत करावी. संपूर्ण इमारतीऐवजी ठाणे महापालिकेने केवळ बाधित कुटुंबासाठी अटी व नियमावली जारी केल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या घरातील कचरा उदारणार्थ मास्क, ग्लोव्हज, इंजेक्शन, सिरिंज तसेच इतर उपचारासाठी लागणारे सामान यांचा कचरा वर्गीकृत करून पिवळ्या पिशवीमध्येच जमा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.