सध्या एमबीबीएस, एमडी, आयुर्वेद अशा विविध शाखांच्या डॉक्टरांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी एकही पद नाही. मात्र, आता या होमिओपॅथी डॉक्टरांनाही लवकरच सरकारी नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सरकारी रुग्णालयांमध्ये होमिओपॅथीचा बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट! )
बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार
सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये ऍलोपॅथीसह आयुर्वेदाचे देखील उपचार मिळतात. त्यामुळे तेथे एमबीबीएस यासह पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या आणि आयुष डॉक्टरांनाही नोकरीच्या संधी प्राप्त होतात. मात्र, होमिओपॅथीचे उपचारच मिळत नसल्याने तेथे या डॉक्टरांनाही संधी उपलब्ध होत नाहीत. मात्र, आता हे उपचारही सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यामध्ये जवळपास 450 होमिओपॅथीचे बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार आहेत.
या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार एक होमिओपॅथी तज्ज्ञांची समितीही गठीत करण्यात आली आहे. या बाह्यरुग्ण विभागासाठी किती खर्च लागेल याचा अभ्यास करून ही समिती सरकारला अहवाल देणार आहे.
सरकारला अहवाल सादर करणार
सरकारी रुग्णालयांमध्ये होमिओपॅथीचा बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यास तिथे होमिओपॅथी डॉक्टरांना नोकरी उपलब्ध होईल आणि सर्वसामान्यांना होमिओपॅथीचे उपचारही मिळतील. याचा सध्या आम्ही अभ्यास करत असून, येत्या तीन महिन्यांत त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात येईल.