सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सध्या बाजारात आल्या आहेत. दुचाकी उद्योगात नावाजलेल्या होंडाने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत उतरायचे ठरवले असून आगमनापूर्वीच कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत ही पेट्रोलवर चालणा-या स्कूटर्सपेक्षा कमी असेल, असे कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सला मिळणारी पसंती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पेट्रोल स्कूटरपेक्षा स्वस्तात
सर्वाधिक स्कूटर्स बनवणारी देशातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने(HMSI) इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात यायची तयारी सुरू केली असून या दशकाच्या अखेरपर्यंत 30 टक्के बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. त्यामुळे कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सर्वसामांन्यांना परवडणारी असावी यावर लक्ष केंद्रित केले आहे. होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकची किंमत ही पेट्रोल अॅक्टिव्हा पेक्षा देखील कमी असेल, असे कंपनीचे भारतातील अध्यक्ष अत्सुशी ओगाटा यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः तुमच्या वाहनाला फॅन्सी नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची)
किती असेल किंमत?
होंडा इलेक्ट्रिक स्कूटर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून येत्या काळात कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटरची आणखी काही मॉडेल्स लाँच करण्यात येणार आहेत. या दशकात कंपनी 10 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विकणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. होंडाच्या पेट्रोल अॅक्टिव्हाची किंमत सध्या 72 हजार ते 75 हजार इतकी आहे. तर इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा ही केवळ 65 ते 70 हजारात उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
काय असतील वैशिष्ट्ये?
Activa हे भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल असल्यामुळे कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव देखील Activa असेच ठेऊ शकते. तसेच स्वॅप करण्यायोग्य बॅटरी हे या स्कूटरचे वैशिष्ट्य असू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वाधिक वेग(टॉप स्पीड) 60 किमी प्रति तास(60kmph) असू शकतो.
Join Our WhatsApp Community