गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू

162

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील हलवाड भागात असलेल्या एका मीठाच्या कारखान्याची भिंत कोसळल्याने तब्बल 30 मजूर ढिगा-याखाली गाडले गेले आहेत. यामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 18 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

12 जणांचा मृत्यू

मोरबी जिल्ह्यातील हलवाड येथे सागर सॉल्ट नावाच्या कारखान्याची भिंत दुपारी 12च्या सुमारास कोसळली. यावेळी कारखान्यात एकूण 30 मजूर काम करत होते. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून, 18 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मोठी जीवितहानी टळली

दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेली भिंत उचलून त्याखाली गाडल्या गेलेल्या मृत आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. महत्वाचे म्हणजे अपघाताच्या काही वेळापूर्वी याठिकाणी 70हून अधिक मजूर काम करत होते. मात्र त्यापैकी 40 मजूर हे जेवायला गेल्याने सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही. अन्यथा मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होऊन, मोठी जीवितहानी झाली असती.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार परशोत्तम साबरिया हे देखील घटनास्थळी दाखल झाले. भिंत कोसळण्याचे मुख्य कारण अजून कळलेले नाही. अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर राधानपूर तालुक्यातील गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.