महापालिका प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना वैद्यकीय सेवेऐवजी प्रशासकीय कामांमध्ये स्वारस्य!

142

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठाता (डिन) यांचा रुग्णालयाऐवजी आता महापालिका मुख्यालय आणि अधिकाऱ्यासमवेतच्या प्रशासकीय कामांच्या बैठकांमध्ये अधिक वेळ जात असून डिन यांचे दर्शनच आता रुग्णालयातील डॉक्टरांना होत नाही. त्यामुळे रुग्णालयातील उपचाराच्या सेवांकडे डिन यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळ या प्रशासकीय कामांमधून मुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी डिन मात्र या प्रशासकीय कामांसाठी इतर कुणा सीईओची नेमणूक करण्यास तीव्र विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे डिन यांना आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवांऐवजी रुग्णालयांच्या प्रशासकीय कामांमध्येच अधिक स्वारस्य दिसून येत आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ‘२७ तासांचा’ मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले)

मुंबई महापालिकेच्या केईए, शीव, नायरसह कुपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रशासकीय कामांसाठी विशेष कार्यकारी अधिकारी(सीईओ)नेमण्याच निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला होता. त्यानुसार डिन यांच्यावरील प्रशासकीय कामांचा भार कमी करून त्या रुग्णालयांमध्ये प्रशासकीय स्वरुपांची कामे करण्यासाठी सहायक आयुक्तांवर सीईओची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु सहायक आयुक्तांना विभागातील कामांकडे लक्ष देतानाच या रुग्णालयांच्या कामांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने तसेच याला लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवल्याने अखेर ही सीईओ नेमण्याचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला होता. परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा याप्रस्तावाचा विचार करत प्रमुख रुग्णालयांमध्ये सीईओ नेमण्याचा निर्णय घेतला. परंतु या हालचाली सुरु असताना सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठातांचा तीव्र विरोध असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्याप्रमाणात दाखल होणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा सुविधा महापालिकेच्यावतीने पुरवली जात असून या सेवा चांगल्याप्रकारे पुरवल्या जाव्यात तसेच डॉक्टरांसह नर्सेससह इतर रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास संपादन करणे हे अधिष्ठात यांचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु रुग्णालयांचे अधिष्ठाता यांच्यावर वैद्यकीय सेवांपेक्षा अधिक रुग्णालय इमारतींचे बांधकाम, साफसफाई, इतर यंत्रांची खरेदी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीची समस्या तसेच विविध कंत्राटे आदी कामांमध्येच अधिष्ठाता अधिक व्यस्थ असतात. यासाठी त्यांना वारंवार महापालिका मुख्यालयात हजेरी लावावे लागते. परिणामी महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांचा दर्जा घसरत चालला असून रुग्णांचाही या रुग्णालयांवरील विश्वास उडत चालला आहे. याला प्रमुख कारण अधिष्ठाता हेच असून रुग्णालयांमधील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अधिष्ठाता यांनी संपूर्ण रुग्णालयांमधील वॉर्डांमध्ये दररोज फेरी मारून माहिती घ्यायला हवी. डॉक्टरांसह इतरांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यामध्ये विश्वास संपादन करायला हवा. परंतु अधिष्ठाता यांच्यावरील प्रशासकीय कामांच्या व्यापामुळे त्यांना रुग्णालयांमध्ये भेटी देण्यासही वेळ नाही. त्यामुळे अधिष्ठाता यांना या प्रशासकीय कामांमधून मुक्त करून प्रशासकीय कामांसाठी सीईओंची नेमणूक करणे आवश्यक आहे.

परंतु प्रशासकीय कामांमधून मुक्त होण्यास अधिष्ठाता तयार नसून त्यांनी या सीईओंच्या नेमणुकीलाच अप्रत्यक्ष विरोध केल्याचे बोलले जात आहे. जर प्रशासकीय कामांसाठी सीईओ नेमल्यास रुग्णालयांमधील विविध प्रकारच्या कामांच्या मंजुरी तसेच कर्मचाऱ्यांच्या हजेरीसह इतर समस्यांकडे अधिष्ठाता यांना लक्ष द्यावे लागणार नाही. त्यांना केवळ रुग्णालयांमध्ये रुग्णांवर होणाऱ्या उपचाराकडे अधिक लक्ष देता येणार आहे. अत्यंत महत्वाच्या बैठकीलाच त्यांना मुख्यालयात अपवादात्मक परिस्थितीत यावे लागेल. परंतु इतर वेळ त्यांचा वाचला जाईल आणि तो वेळ त्यांना रुग्णांच्या सेवांमध्ये देता येईल,असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रशासकीय कामांमुळे डॉक्टरांनाच अधिष्ठातांची भेट होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.