आगीच्या घटनांना आता रुग्णालय प्रशासन जबाबदार

अपघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक उपाययोजनाही या परिपत्रकानुसार जारी करण्यात आल्या आहेत.

84

कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. या आगी लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने, रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.

अखंडित वीज पुरववठ्यासाठी निर्देश

कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. रुग्णालयात अंतर्गत वीज संच मांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडित वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.

(हेही वाचाः आता दहावीपर्यंत सर्व शाळांना मराठी विषय सक्तीचा)

फायर ऑडीट करावे लागणार

उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ”ना हरकत प्रमाणपत्र” मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करुन घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडीट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करुन अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे.

मायक्रोकंट्रोलर संयंत्र बसवण्याच्या सूचना

आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर संयंत्र अंतर्गत वीज संरचना मांडणीमध्ये निर्माण होणाऱ्या दोष किंवा असामान्य बाबींचे विश्लेषण करुन दोष निदान करणे शक्य होते. वीजसंच मांडणीच्या संरचनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती एकत्रित करुन त्याचे विश्लेषण करू शकणारे एन.ए.बी.एल. टेस्टिंग लॅबद्वारे प्रमाणित असे आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर संयंत्र सर्व शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये बसवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तसेच शासकीय, खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक इमारतींच्या परिसरात कार्यरत असलेल्या उद्वाहनामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक उपाययोजनाही या परिपत्रकानुसार जारी करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचाः 100 टक्के नागरिकांना लसीचा ‘पहिला’ डोस देणारे ‘हे’ आहे देशातील पहिले राज्य)

रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- राऊत

कोरोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश जारी केले असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.